US Job Fraud: अन्न-पाणी नाही, मेक्‍सिकोचे जंगल, अमेरिकन सैनिकांची गस्‍त; गोव्यातून परदेशात नोकरीसाठी गेलेल्यांची कशी झाली फसवणूक?

Goan youth US job fraud: हालअपेष्‍टा सोसून हल्‍लीच गोव्‍यात पोचलेल्‍या नुवे येथील नीतेश नाईक याने सांगितलेली ही आपबिती ऐकल्‍यास कुणाच्‍याही अंगावर काटा यावा.
Goa Job Fraud Case
Goa Job Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बरोबर नेलेला अन्नाचा साठा संपल्‍याने भुकेने कासावीस झालेला जीव, त्‍यातच नेलेले पाणीही संपायला आलेले. मेक्‍सिकोची सीमा ओलांडून कुणीही बेकायदेशीररित्‍या अमेरिकन हद्दीत घुसू नये, यासाठी मोठमोठ्या कुत्र्यांना घेऊन सैनिकांची गस्‍त आणि जंगलात लपून बसलेल्‍या स्‍थलांतरितांना शोधण्‍यासाठी हॅलिकॉप्‍टरने केली जाणारी टेहळणी... अशा तणावपूर्ण वातावरणात उघड्यावर जंगलात काढलेले ते तीन दिवस अंगावर काटा आणणारे होते.

अमेरिकेत दरमहा ५ लाख रुपयांचा पगार मिळणार, या आशेने अमेरिकेला जाऊ पाहणाऱ्या; पण प्रत्‍यक्षात या मोहापायी लाखो रुपये गमावलेल्या गोमंतकीय युवकांनी सांगितलेला हा अनुभव कटू तर होताच, शिवाय त्‍यांची उज्ज्वल भविष्‍याची स्‍वप्‍ने उद्ध्‍वस्‍त करणाराही. त्‍यानंतर आलेला अनुभव तर आणखीनच भयानक. कसेबसे मॅक्‍सिकोची हद्द ओलांडून अमेरिकन भूमीवर पाऊल पडताच झालेली अटक आणि त्‍यानंतर तब्‍बल चार महिने अमेरिकेतील बेकायदेशीर स्‍थलांतरितांच्‍या कॅम्पमध्‍ये झालेली स्‍थानबद्धता.

ही सर्व हालअपेष्‍टा सोसून हल्‍लीच गोव्‍यात पोचलेल्‍या नुवे येथील नीतेश नाईक याने सांगितलेली ही आपबिती ऐकल्‍यास कुणाच्‍याही अंगावर काटा यावा. वास्‍तविक नीतेश पूर्वी आखाती देशात काम करून आलेला. मात्र, युरोपियन देशात कामाला गेल्‍यास चांगला पगार मिळेल, यासाठीच त्‍याने अजय शिरोडकर या एजंटशी संपर्क साधला. अजयने त्‍याला युरोपियन देेशात न जाता अमेरिकेत जाण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यासाठी त्‍याने तब्‍बल २८ लाख रुपये मोजले; पण प्रत्‍यक्षात नशिबी आली ती अशी हालअपेष्‍टाच.

सध्‍या स्‍वत:ला ‘कॅप्‍टन’ म्‍हणवून घेणाऱ्या अजय शिरोडकर आणि त्‍याच्‍या अन्‍य दोन साथीदारांवर क्राईम ब्रँचने गुन्‍हा नोंद केला असून आतापर्यंत या एजंटविरोधात क्राईम ब्रँचकडे चार तक्रारी दाखल झाल्‍या आहेत. नीतेशने दिलेल्‍या माहितीप्रमाणे, अजय शिरोडकर आणि त्‍याच्‍या साथीदारांनी किमान ३७ जणांना अशा रितीने गंडा घातला आहे. सप्‍टेंबर २०२४ च्‍या दरम्‍यान नीतेशने अजयशी संपर्क साधला होता. आपल्‍याकडे अमेरिकेत नाेकऱ्या उपलब्‍ध असल्‍याचे आश्‍वासन त्‍याने दिले होते.

अधिकृतपणे त्‍यांना अमेरिकेत नेण्‍याची ग्वाहीही दिली होती. यासाठी सर्व कायदेशीर सोपस्‍कार पूर्ण केले जातील, असेही त्‍यांना सांगितले हाेते; पण प्रत्‍यक्षात त्‍यांना बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून अमेरिकेत नेण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍यामुळे दोनवेळा त्‍यांना अमेरिकेत पोचण्‍यापूर्वीच भारतात डिपोर्ट केले होते. ‘आमचे पैसे परत द्या, आम्‍हाला अमेरिकेत जायचे नाही’ असे या युवकांनी त्‍या एजंटला सांगूनही तुम्‍ही शेवटची संधी घ्‍या, मी तुम्‍हाला सुखरूप अमेरिकेत पोचवितो, असे सांगून ९ डिसेंबर २०२४ रोजी नीतेश आणि आणखी चारजणांना पुन्‍हा पाठविले. गोवा ते चेन्नई, चेन्नई ते बँकाॅक, बँकाॅक ते चीन आणि चीन ते मेक्‍सिकोतल्‍या तिजुआना असा तो प्रवास होता.

Cash For Job Scam, Goa Job Fraud, Government Job Scam
Goa Job Fraud, Pooja Naik Case, Deepashree Sawant CaseCanva

नीतेश म्‍हणताे, इथपर्यंतचे सर्व ठीक होते; पण नंतरचा प्रवास अंगावर काटा आणणारा होता. तिजुआना येथे जाण्‍यापूर्वी आम्‍हाला काही सूचना केल्‍या होत्‍या. सोबत फारसे कपडे घेतले नाहीत तरी चालेल; पण खाण्‍याच्‍या वस्‍तू भरपूर घ्‍या, असे सांगण्‍यात आले. त्‍यावेळी आम्‍हाला असे का सांगितले, हा प्रश्‍न पडला होता. पण त्‍याचा प्रत्‍यय लगेच आला. तिजुआना येथून आम्‍हाला बेकायदेशीररित्‍या अमेरिकेत घुसविण्‍याचा हा प्रयत्‍न होता. सीमेवर गस्‍त घालणाऱ्या हेलिकॉप्‍टरच्‍या टेहळणीवेळी आम्‍ही दृष्‍टीस पडू नये, यासाठी आम्‍हाला तब्‍बल तीन दिवस जंगलात लपविले होते.

Goa Job Fraud Case
Goa Government Job: महत्वाची बातमी! देशभरातील उमेदवारांना गोव्यात मिळणार सरकारी नोकरीची संधी; 'स्थानिकां'ची अट घटनाबाह्य

संशयितांची न्‍यायालयात धाव

नीतेशने दिलेल्‍या तक्रारीनुसार, क्राईम ब्रँचने अजय शिरोडकर, संकेत शिरोडकर आणि अवेश काकाेडकर या तीन संशयितांविरोधात गुन्‍हा नोंद केला आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली. तिन्‍ही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून आज पणजीच्‍या सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांच्‍यासमोर हा अर्ज सुनावणीस आला होता. मात्र, नीतेशने या प्रकरणात हस्‍तक्षेप याचिका दाखल केल्‍यामुळे ही सुनावणी २० मेपर्यंत तहकूब केली आहे.

Goa Job Fraud Case
US Job Fraud: बनावट दस्तावेज देऊन अमेरिकेत नोकरीला पाठवले! लाखोंची अफरातफर; 3 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

डिटेन्‍शन कॅम्प

कुठे झक्‌ मारली आणि अमेरिकेत नोकरीसाठी जाण्‍याचे मनात आले, असे आम्‍हाला त्‍यावेळी वाटत होते. शेवटी आणखी सहा लाख रुपये खर्चून अमेरिकेत वकील नेमून मी माझी सुटका करून घेतली, असे त्‍याने सांगितले. माझ्यासोबत गेलेला उबाल्‍दीनो हा युवक अजूनही अमेरिकेतील डिटेन्‍शन कॅम्पमध्‍ये खितपत पडला आहे, असे नीतेशने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com