पणजी : अमेरिकेत एका अज्ञात हल्लेखोराच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या चांदरच्या जॉन डायस या तरुणाच्या मृतदेहावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे एका लुटारूकडून झालेल्या गोळीबारात जॉनचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पहाटे गोव्यात पोहोचल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदरचे सरपंच एडवर्ड फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 2 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता त्याचा मृतदेह गोव्यात पोहोचला होता. संध्याकाळी 4 वाजता त्याच्या मृतदेहावर चांदर या त्याच्या मूळ गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळींसह मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. गेल्या 10 दिवसांपासून जॉनचा मृतदेह गोव्यात आणण्यासाठी गोवा सरकारसह (Goa Government) एनआरआय कमिशनचे प्रयत्न सुरु होते. अखेर सरकारच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी चांदर येथील चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.
दुपारी 3 वाजता घरातून जॉनचं पार्थिव चर्चमध्ये नेण्यात आलं, जिथे ख्रिस्ती धार्मिक पद्धतीनुसार विधी केल्यानंतर चांदरमधीलच स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. जॉनची आई इनासिन्हा डायस आपल्या मुलाला पाहण्यासाठी व्याकूळ झाल्याचं चित्र चांदरमध्ये पाहायला मिळालं. जॉनच्या मृत्यूने डायस कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अमेरिकेतील पोलिसांनी जॉन डायस या गोमंतकीय तरुणाच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्याला 5 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. आता अमेरिकेतील पोलिसांनीही जॉनच्या हत्येचा (Murder) छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एक मास्कधारी व्यक्ती बराच वेळ जॉन काम करत असलेल्या गॅस स्टेशनच्या बाहेर घुटमळत होता. काळ्या रंगाचे कपडे आणि हुडी घातलेल्या व्यक्तीने अचानक दुकानात प्रवेश केला आणि काऊंटरवर असलेल्या जॉनवर गोळ्या झाडल्या. जॉनची हत्या करुन मास्कधारी व्यक्ती दुकानातून पळून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचंही अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.
जॉन हा एक चांगला फुटबॉलपटू होता. दक्षिण गोव्यातील चांदर आणि गिरदोली येथील क्लबसाठी तो पूर्वी गोलकिपिंग करायचा. मात्र रोजगाराच्या पोटी तो तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत (America) गेला होता. तिथेच त्याच्यावर हा आघात झाला. जॉनच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चांदर गावावर शोककळा पसरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.