
विनायक खेडेकर
लोककला म्हणजे नेमके काय, स्थानिक संस्कृतीशी कायम जोडली गेली असलेली तिची नाळ; एवढेच नव्हे तर जन-समुदायाच्या सर्वांगीण जीवनप्रणालीशी व्यापूनही उरलेले तिचे भावानुबंध प्रथम समजून घ्यायला हवेत. कारण प्रदूषणाची पाळेमुळे यात रोवलेली आहेत. म्हणूनच ‘लोककला‘ हा शब्द, व्याख्या, संकल्पना डोळसपणे नीट समजून घ्यायला हवी.
गाव वा सार्वजनिक स्तरावर कोणीही पुरस्कृत केल्याविना, कोणत्याही आधुनिक साधनसुविधा न वापरता, प्रति-वार्षिक वा ‘तिसाल‘ आचरीत होणाऱ्या नृत्य, नाट्य, संगीत, गीत अशा कलात्मक आविष्कृतींना ‘लोककला’ अभिधान लावता येते.
आरंभ कधीपासूनचा हे अज्ञात असलेल्या परंपरा; ‘गावकरी’ वा विशिष्ट वांशिक गट. निर्धारित दिनी ठरल्या वेळी, निश्चित स्थानी, वाडवडिलांपासून चालत आलेले जे काही, याच त्या ठरल्या पद्धतीने, आचरण स्वरूपात करतो, अशा कलात्मक कृतींनाच ‘लोककला’ संज्ञा प्राप्त होते.
काही सामाजिक अथवा कौटुंबिक कारणास्तव अडचण असेल तर तो विधी रूपात, प्रतीकात्मक पद्धतीने त्याच वा इतर दिवशी पार पडतो. पुन्हा या संपूर्ण गतीविधीत नागर वा शिष्ट समाजाचा कोणताही सहभाग नसतो, वा त्यांना अशा आचरणअंशी कोणतेही देणेघेणे नसते.
आदिवासींचा ‘तोणयो‘ प्रकार फक्त मांडावर होतो. प्रतीक रूपात वीरभद्र होतो. फक्त मांडावर पारंपरिक गीते गाऊन ख्रिस्ती गावड्यांचा ‘जागोर’ वा ख्रिश्चन महिलांचा ‘धालो’ होतो. हे चक्षुर्वै सत्य आहे.
१.‘गोवन फोकलोर‘ म्हणून ख्यात असलेला ‘मांडो‘ हा बोर्डरूम डान्स असल्याचे सांगून तो इ. स. १८६० साली सुरू झाल्याचे प्रतिपादन लुसियोरॉड्रिक्स हे संशोधक करतात. कोणीतरी पुरस्कृत केल्याविना, ‘हॅलो- माइक टेस्टिणग वन्, टू, थ्री झाल्याविना कोठेही, कधीही मांडो हा प्रकार होत नाही.
२. ‘देखणी’ हा नृत्य प्रकार पोर्तुगीज गोऱ्यांच्या मनोरंजनासाठी काही विशिष्ट महिला-मुली सादर करत होत्या, असे उल्लेख मिळतात. बहुधा विसाव्या शतकातील घटना. उपलब्ध माहितीनुसार देखणी नावाची तीन गीते उपलब्ध आहेत. यातील ‘हांव सायबा पोलतोडी‘ याची विद्यमान चाल प्रोफेसर आन्श्चर लोबो या मुंबईस्थित गोमंतकीय संगीतकाराची आहे. हे गृहस्थ माझ्या चांगल्या परिचयाचे. त्यांनी सांगितले होते ते मागाहून मायकेल मार्टिन या दुसऱ्या संगीतकाराने मान्य केले. गीतातील ‘नाचोता‘ व कलावंतांचे खडळू या दोन्ही संकल्पना गोव्यातील लोककला संदर्भातील मौखिक परंपरेत कोठेही सापडत नाहीत
३. समई नृत्य-‘दिवल्यां नाच’ हे कसरती- अॅक्रोबॅटिक स्वरूपाचे. यात नव्या रचना-शैलींचीही भर पडत आहे. विशिष्ट ठेका देणारे कोणतेही गीत, नाट्यगीत ते सामान्य काव्यरचना, याला चालते. मूलतः काणकोणात शिगम्यातील परंपरा असली तरी विद्यमानकाली ‘पुरस्कर्ता‘ पद्धतीतून अनेक पथके सादर करतात.
नोंद हवी असे: देखणी व समयी नृत्य हे दोन्ही प्रकार विनायक खेडेकरांच्या ‘गोमंतकीय लोककला‘ या पहिल्या पुस्तकात नमूद आहेत. नोंद याचीही हवी की निदिध्यासी अभ्यासानंतर, ‘फोक डान्सेस ऑफ गोवा’ या इंग्रजी पुस्तकात या चुका सुधारल्या गेल्यात.
४. कळशी फुगडी. कथा थोडी वेगळी. आदिवासींकडे एरवी सर्वत्र घरात बहुतेक मातीची भांडी-कुंडी. उन्हाळ्यातील भाजीमळा शिंपणे, पाणी दुरून आणायचे त्यासाठी धातू-पितळीच्या कळश्या-घागरी. पाणी हे जीवन. त्यामुळे कळशी कधीच पूर्ण रिती राहू नये हा संकेत पाळला जातो. भाजीमळा शिंपण्यासाठी कितीतरी खेपा व्हायच्या. रिकामी घागर घेऊन परतताना ती फुंकीने भरायची. श्रमपरिहार म्हणून ती नाचवायची. यातून ‘कळशी फुगडी’ अस्तित्वात आली. पूर्वकाली सर्वच आदिवासी महिला ‘कळायो‘ नावाच्या चकत्यासम दिसणाऱ्या पितळीच्या भरपूर बांगड्या भरायच्या. या बांगड्या हालचाली वेळी तसेच कळशी हलवताना आपटल्याचा छान ठेका मिळायचा. हा नाद, फुंक घातल्याने येणारा खोल गंभीर ध्वनी; साथीला स्वरचित धिल्लोतील काही गीत पंक्ती वा
आमी बाबऱ्यो हातीन घागऱ्यो |
माळ्याचे मळशेबि शिंपताल्यो गे बाय|
अशा सहजस्फूर्त गीतपंक्ती. सोबतीला राकट, दणकट पदन्यास, चपळ हालचाली; ही कळशी फुगडी. कला अकादमी लोककला महोत्सवात पाहिल्यानंतर अनेक व्यावसायिक पथकांनी ती उचलली. कुठल्या तरी गीतपंक्ती वा सुमार कोकणी गीत, स्टीलच्या घागरी, ठरीव, ठाशीव पदन्यास. हातातील काचेच्या वा प्लास्टिकच्या बांगड्यामुळे तो नाद-ठेका हरवलेला.
छातीत दम नसल्याने फुंक घालणे बंद. वाकडी-तिकडी कळशी नाचवत; विद्यमान काळची ‘कळशी फुगडी’ अशी प्रदूषित रूपात सादर होते. नाजूक पावलांना निसटता भूस्पर्श, असे आधुनिक कोरियोग्रफी तंत्र वापरून तिला ‘परंपरा जतन‘ पुरस्कारही मिळतात. तिकडे आदिवासींची पंप-पाइपलाइनमुळे बंद पडली. कायमची. विद्यमान काळची कळशीऐवजी बादली घेतली तरी चालेल फक्त ‘बादली फुगडी‘ म्हणायचे अशी ती होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.