Goa Folk Dance: ‘प्रदर्शनीय वस्तू’ बनल्यामुळे गोमंतकीय लोकनृत्ये नष्ट होण्याच्या मार्गावर; गोव्यातील नृत्यशैलींबाबत विशेष लेख

Folk Dances of Goa: देवाची पालखी फिरवताना ‘कलावंतांनी’ केलेले नृत्य पाहावयास मिळते. शास्त्रीय गाण्यांच्या बंदिशींवरसुद्धा नृत्य केले जाते.
Folk Dances of Goa
Goa’s Traditional Dance Forms Dainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

आदिम काळापासून भारतीय आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, यातुक्रियेसाठी व मृतात्म्यांना संतुष्ट करण्यासाठी नृत्याचा वापर करीत आले आहेत. मेसोलीथिक (मध्य पाषाण-युग) काळातील, सिंधू संस्कृतीतील नृत्याच्या अविष्कारांचे पुरावे भारतात सापडलेले आहेत. वेदकाळ, बौद्धकाळ, रामायण-महाभारत, कामसूत्र, कौटिल्यकाळ, इत्यादींमध्ये नृत्यकलेचा उल्लेख आढळतो. आजही भारतीय आदिवासींच्या नृत्यांच्या सूक्ष्म अभ्यासातून अव्याहतपणे प्रभावी राहिलेल्या नृत्यकलेच्या स्वरूपांचा आणि लक्षणांचा अभ्यास करता येतो.

भारतीय संस्कृतीची प्रमुख घटक असलेली लोकनृत्ये विकसित होत गेली. सादरीकरणांच्या विविध शास्त्रांच्या आणि तंत्रांच्या निर्मितीतून भारतात अनेक शास्त्रीय नृत्यप्रकार मान्यता पावत आलेले आहेत.

दक्षिण भारतातील मंदिरांत देवदासींद्वारा पूर्वापार चालत आलेले, द्रविड संस्कृतीचा प्रभाव असलेले, ‘भरतनाट्यम’ पूर्वी ‘दासीअट्टम’ किंवा ‘सदीर’ म्हणून ओळखले जात होते. प्रामुख्याने संस्कृत, तामीळ, कन्नड, तेलगू, भाषांतील नृत्य-रचना असलेल्या या नृत्यप्रकारांत भाव, राग, ताल आणि नाट्य यांचा सुंदर मिलाफ घडलेला दिसून येतो.

उत्तर भारतात उगम पावलेल्या ‘कथ्थक’ नृत्यात प्रामुख्याने हिंदुस्थानी संगीताचा वापर होतो. केरळची शैली लाभलेल्या ‘कथकली’त द्रविड व आर्य संस्कृतीचा प्रभाव आढळतो. ईशान्य भारतातील ‘मणिपुरी’ नृत्यशैलीवर वैष्णव संप्रदायांचा प्रभाव आहे. ‘कुचीपुडी’ या आंध्र प्रदेशातील नृत्यप्रकारावर ‘भक्ती’ चळवळीचा परिणाम दिसतो. ‘ओडिसी नृत्य’ मंदिरातील कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून सादर केले जाते.

गोव्यात स्वतंत्र शास्त्रीय नृत्यशैली अस्तित्वात नाही. विनायक खेडेकर यांच्या ‘लोकसरिता’ या ग्रंथातल्या ‘लोकनृत्य’ या भागात गोव्यात धनगर-नृत्य, धनगरी-फुगडी, कुणबी-नृत्य, ‘दांडलाखेळ’, ‘भदप’, कळशी-फुगडी, मुसळ-नृत्य, घोडेमोडणी, वीरभद्र, ‘हाणपेट’, ‘तोंणयामेळ’, गोफ, ‘मोरुले’, समई-नृत्य, फुगडी, ‘देखणी’, ‘मांडो-नृत्य’, पेणे, घोडा-घालणे, ‘रातीब’, कार्निवाल-नृत्य, इत्यादी गोव्यातील लोकनृत्यांची सखोल माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी जरूर अभ्यास करावा.

देवाची पालखी फिरवताना ‘कलावंतांनी’ केलेले नृत्य पाहावयास मिळते. शास्त्रीय गाण्यांच्या बंदिशींवरसुद्धा नृत्य केले जाते. पण हल्ली या नृत्यामुळेच आपल्याला ‘हीन’ लेखले जाते याचे भान होऊन किंवा हे देवकार्य नसल्याचे वाटून या नृत्यांगनांचे पालखीबरोबर नाचणे बंद होऊन, आधुनिक बँड वादनाने, देवाची पालखी निघते. देव-देवतांच्या विसर्जनांच्या वेळीही बँड वादनाचा किंवा ‘डीजे’चा अंतर्भाव असतो.

पोर्तुगीज कालखंडापासून गोव्यातील नृत्यप्रकारात ‘भारतीय’ आणि ‘वेस्टर्न’ हा फरक आहे. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय नृत्य शिकण्याची अस्सल पद्धत होती. विद्यार्थी आपले बहुमोल आयुष्य ही कला शिकण्यात घालवीत असत व गुरूच्या परवानगीनंतरच कार्यक्रम करत असत. नागरी कृत्रिम जीवन जगताना, जगण्यातील निरर्थकता किंवा शून्यता भासणाऱ्या लोकांना, आपण लोकसंस्कृतीपासून फारच लांब गेल्याचे जाणवल्यामुळे ते लोकपरंपरेत संजीवक सामर्थ्य शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Folk Dances of Goa
Goa Culture: गोव्यातील पारंपरिक लोकवादनाचा ठेवा संवर्धित करण्यासाठी कोणी तारणहार सापडेल का?

हल्ली गोव्यात ‘कला व संस्कृती क्षेत्रात’ राज्यकर्ते आणि त्यांचे अभिजन कर्मचारी ‘वाट लावणारे’ निर्णय घेत आहेत. क्षेत्रातील संबंधित जाणकार व्यक्त व्हायला कचरत आहेत. पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने गोमंतकीय नृत्यांचे झपाट्याने व्यावसायिकीकरण होत आहे. ‘प्रदर्शनीय वस्तू’ बनल्यामुळे ही लोकनृत्ये नष्ट होण्याच्या मार्गावर उभी आहेत. नृत्य शिकण्यासाठी वेळ देण्याऐवजी ‘इलेक्ट्रॉनिक म्युझिक’वर डोलणाऱ्या तरुणाईचा वर्ग वाढत आहे. पर्यटन व्यवसायाने आणलेल्या हिप्पी संस्कृतीचा परिणाम गोमंतकीय जीवनावर होत असून, हे प्रकरण कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे खालील उदाहरणावरून दिसून येईल.

गेल्या काही वर्षांत गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर ‘सनबर्न’सारख्या इडियम नृत्यांचा सुळसुळाट झाल्याचे आपण पाहत आहोत. पण यंदा तर कहरच झाला. समुद्रकिनाऱ्यांवर नाचणारे देशी-विदेशी पर्यटक आणि नाममात्र ‘पासधारी’ गोवेकर लोक मोपा एअरपोर्टच्या वाटेवरील सुक्याकुळणातील खडकाळ जमिनीवर ‘अघोरी शक्ती’निशी थयथया नाचले. काही जणांनी तर परलोकी पोहोचण्याचा ‘परमानंद’ या नृत्यातून अनुभवला.

Folk Dances of Goa
Goa Culture: डॉ. मोहम्मद आणि ख्रिसमसचा गोठा

भारतीय परंपरेत शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी गुरूंनी आणि शिष्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले पण या इडियम नृत्यात हजारो वॅटची कानठळ्या बसवणारी ‘साऊंड सिस्टम’ लागली की लगेच नृत्य करायला (पदन्यास शब्दाचा अर्थ माहीत नसूनसुद्धा) समजू लागते.

वेस्टर्न म्युझिकच्या ‘तालावर’ धारगळ ‘सनबर्न’ची जोरदार तयारी चालू असताना अशा संस्कृतीविरोधी नृत्याला विरोध करणाऱ्या लोकांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी राजकारण्यांनी आणि तथाकथित अभिजनांनी नवीन ‘तालांची’ बांधणी केली. स्थानिक सामान्यजन राज्यकर्त्यांच्या आणि अभिजनांच्या या ‘अनवट तालांच्या मात्रांना घुसपल्यामुळे’ भलतीकडेच ‘नाचायला’ लागले. बारबालांसारखे ‘नृत्यावर’ उधळलेले पैसे जमा करताना कित्येकांचे नृत्य ‘पॉज’ झाले. योग्य न्याय मिळण्याच्या आशेने ‘अतिविलंबित तालावर’ नाचता-नाचता उर्वरित विरोधकांचे नृत्यच थांबले आणि सुक्याकुळणातील ‘ओले’ (ओके) झालेले नृत्य ‘तालांची’ ‘दुगुन-चौगुन’ करून सुखरूप पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com