Harshad Gadekar Retirement: दशकभरापूर्वी गोव्याचा रणजी क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू ठरलेला, पण नंतर दुखापतीमुळे कारकिर्दीला फटका बसलेला अष्टपैलू क्रिकेटपटू हर्षद गडेकर याने मंगळवारी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली. त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून एकूण 114 विकेट मिळविल्या.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत 36 वर्षीय हर्षद 2007 ते 2016 या कालावधीत खेळला. त्याने दोन वेळा डावात पाच गडी बाद करताना वेगवान गोलंदाजीने 27.40 च्या सरासरीने 67 विकेट, तर फलंदाजीत दोन अर्धशतकांसह 326 धावा केल्या.
लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत हर्षद 2007 ते 2021 या कालावधीत 21 सामने खेळला. एक वेळ डावात पाच गडी बाद करताना त्याने 32.71च्या सरासरीने 28 गडी बाद केले, तसेच एका अर्धशतकासह 175 धावा केल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये तो २०१० ते 2014 या कालावधीत 14 सामने खेळला, या स्पर्धेत त्याने 19 विकेट घेताना फलंदाजीत 96 धावाही केल्या.
समर्पित भावनेने खेळलेला क्रिकेटपटू
संपूर्प कारकिर्दीत हर्षदने समर्पित भावनेने अफलातून खिलाडूवृत्ती आणि प्रतिभा प्रदर्शित केली. त्यामुळे तो नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान ठरला.
त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आणि राष्ट्रीय पातळीवरील राज्य संघासाठीची अतूट बांधिलकी गोवा क्रिकेट असोसिएशनप्रती दखलप्राप्त आहे, असे हर्षदच्या कामगिरीचा गौरव करताना जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी नमूद केले.
राज्य संघातर्फे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि युवा खेळाडू ते व्यावसायिक खेळाडू या प्रवासात सदोदित प्रोत्साहन दिल्याबद्दल हर्षदने गोवा क्रिकेट असोसिएशनचे मनःपूर्वक आभार मानले. जीसीएने हर्षदला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.