

बोरी: जिल्हा पंचायत निवडणुकीत बोरी मतदारसंघातील सत्ताधारी भाजपच्या उमेदवार जाहीर केल्यावर अनेक इच्छुकांनी रिंगणात उतरण्याचे ठरविल्याने भाजपच्या उमेदवारांसमोर भाजपच्याच कार्यकर्त्या महिला ठाकल्याचे सिध्द झाले आहे.
बोरी जिल्हा पंचायत मतदारसंघात बोरी आणि बेतोडा-निरंकाल, कोनशे-कोडार हे दोन गाव येतात.
या मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवला व पक्षाने बेतोडा-निरंकालच्या माजी सरपंच पूनम सामंत यांना उमेदवारी दिल्याने जाहीर करताच मागच्या सतत दोन खेपा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले दीपक नाईक बोरकर यांनी हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवला गेल्याने आपली पत्नी सेजल दीपक नाईक बोरकर यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक आखाड्यात उतरवण्याचे ठरविले आहे.
बोरी पंचायतीच्या उपसरपंच भावना मनुराय नाईक यांनीही स्वतंत्र उमेदवारी भरण्याचे निश्चित केले आहे. तर बेतोडाच्या प्रज्योती शेटकर यांनीही स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवून आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. आरजी पक्षातर्फे गड्डेर-तामशिरे येथील हर्षा नाईक यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित झाले आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे अद्याप कोणाच्याच हालचाली दिसून येत नाहीत.
दरम्यान, दक्षिण गोव्यातून जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी पाच मतदारसंघांतून एकूण सहा उमेदवारांनी अर्ज भरले असून दक्षिण गोव्यातून एकूण आतापर्यंत सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दक्षिण गाेव्यात समाविष्ट होणाऱ्या उसगाव-गांजे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मनीषा शेणवी उसगावकर, बेतकी-खांडाेळा मतदारसंघातून अपक्ष सुनील धर्मा जल्मी, सावर्डे मतदारसंघातून भाजपचे मोहन गावकर, धारबांदोडा मतदारसंघातून भाजपचे रूपेश रामनाथ देसाई तर पैंगीण मतदारसंघातून अपक्ष दीक्षा दया पागी व विपीन प्रभुगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
बोरी, बेतोडा-निरंकाल हे शिरोडा विधानसभा मतदारसंघातील गाव असून या मतदारसंघांवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचे वर्चस्व असून मंत्री शिरोडकर सांगतील त्याप्रमाणे वागणारे, काम करणारे कार्यकर्ते व लोक आहेत. या मतदारसंघावर पूर्वी उपसरपंच भावना नाईक किंवा माजी उपसरपंच परिमल सामंत यांची नावे भाजपचे उमेदवार म्हणून घेतली जात होती. परंतु पूनम सामंत यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यावर भाजपसाठीच कार्य करणाऱ्या सेजल, भावना, प्रज्योती या तीन महिलांनी आखाड्यात उतरण्याचे ठरविल्याने पूनम सामंत यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. पक्षश्रेष्ठी आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हेच यावर तोडगा काढू शकतील, असे मतदारांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.