दाबोळी: डेंग्यू (Dengue) व इतर विषाणूजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा व एकमेकाशी समन्वय ठेवण्याचा निर्णय मुरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,सचिव आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. मुरगावचे गट विकास अधिकारी प्रसिध्द नाईक यांनी डेंग्यू व इतर आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायती सर्व आरोग्य केंद्रांना पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन दिले.
मुरगाव तालुक्यामध्ये डेंग्यूने डोके वर काढल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत.याप्रकरणी योग्य ती उपाययोजना व जागृती करण्यासाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष, नगरसेवक व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली होती. तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच यांचीही बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते.
मुरगाव तालुकयातील दहा पंचायतीचे सरपंच, सचिवांसाठी डेंग्यू रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यासंबंधी बैठकीचे आयोजन चिखली पंचायतीच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य खात्याच्या व्हेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या राज्य प्रमुख डॉ. कल्पना महात्मे, गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स, कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुकोर क्वाद्रोज, चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, गटविकास अधिकारी प्रसिध्द नाईक व इतर उपस्थित होते. डॉ. क्वाद्रोज यांनी डेंग्यूसंबंधी सादरीकरण करताना मुरगाव तालुक्याच्या विविध गावांमधील घरांमध्ये डासांचा कसा शिरकाव होत आहे, त्याचा कसा प्रसार होत यासंबंधी योग्य माहिती दिली. डेंग्यूविरुध्दच्या लढाईत समाजाचा पाठिंबा व पंचायतींच्या सहभागावर त्यांनी भर दिला. डॉ. कल्पना महात्मे यांनी शहर आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर आरोग्य केंद्रामार्फत संपूर्ण गोव्यामध्ये डेंग्यू, मलेरिया प्रसाराचा सामना करण्यासाठी स्विकारलेल्या रणनीती स्पष्ट केल्या. सार्वजनिक आरोग्य कायदा 1985 व नियम 1987 च्या विविध कलमांवर प्रकाश टाकून ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
श्री,मार्टिन्स यांनी डेंग्यू व इतर आजारांचा प्रसाराचा सामना करण्यासाठी नागरिकांकडून सहाय्य मिळाले पाहिजे असे सांगितले. त्यांनी कचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणी, स्वच्छता, जैवविविधता व्यवस्थापन संबंधी विविध पंचायत स्तरीय समित्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकाला. पंचायतींना व्हेक्टर जनित रोग नियंत्रणासाठी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी वाटप करण्याची गरज व्यक्त केली. प्रभाग लोकप्रतिनिधींनी बांधकाम स्थळांना भेटी द्यावात, डासांच्या उत्पती स्थळे शोधावी, कंत्राटदारांना आरोग्य कार्ड घेण्यासंबंधी प्रोत्साहित करावेत , रिकामी घरे, बेवारस वाहने यांसंबंधी आरोग्य केंद्राना माहिती द्यावी, नियमितपणे सामुदायिक स्वच्छता मोहिमा आखाव्यात असे आवाहन केले.
ग्रामपंचायतीच्या पधरवड्यातील बैठकीत डेंग्यू व इतर आजारासाठी करण्याचा, प्राथमिक आरोग्य केंद्राने डेंग्यूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्याची, डेंग्यू चा मुकाबला करण्यासाठी विविध समित्यांच्या बैठका घेण्याचा व पुढील चार महिन्यांमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम प्रखरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.