
मडगाव: नेत्रावळी परिसरात काल (२३ फेब्रुवारी) अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावल्यानं स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली.
सध्या संपूर्ण गोव्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना नेत्रावळी परिसरात या अवकाळी पावसामुळं तापमानात किंचित घट झाली असून गारवा जाणवू लागला आहे. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे काही वेळ गोंधळ उडाला असला, तरी अनेक नागरिकांनी या अवकाळी सरींचा आनंदही लुटला.
नागरिक आणि पर्यटकांसाठी हा पाऊस आनंददायक असला, तरी स्थानिक शेतकऱ्यांसाठी मात्र तो चिंतेचा विषय ठरला. अवकाळी पावसामुळे काही पिकांना फायदा होऊ शकतो, तर काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पाऊस मारक ठरू शकतो.
बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता
नेत्रावळी परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी आणि बागायतदारांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः काजू आणि आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी आणि मार्च हे महिने काजू आणि आंब्याच्या झाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र, अशा वेळी पडलेला अवकाळी पाऊस बागायती पिकांसाठी नुकसानदायक ठरू शकतो.
फेब्रुवारी महिन्यात काजू आणि आंब्याच्या झाडांना बहर येत असतो, त्यामुळे अवकाळी पावसामुळे फुलगळ होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी पावसानंतर सतत ढगाळ वातावरण राहिल्यास या पिकांना मोठा फटका बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.