

पणजी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यासह कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १.९५ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २९.४४ इंच, म्हणजेच जवळपास ३० इंच पावसाची नोंद झाली आहे.
२० जून रोजी राज्यात तब्बल ७१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली होती. आता ती २७ टक्क्यांवर आली असून, गेल्या १३ दिवसांत तब्बल ४४ टक्के तूट भरून निघाली आहे. पुढील चार-पाच दिवस अशाच स्वरूपाचा पाऊस झाल्यास उर्वरित तूटही भरून निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत पडझडीच्या घटनाही घडल्या.
गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक ३.४२ इंच पावसाची नोंद फोंड्यात झाली. त्याखालोखाल वाळपई येथे २.७५ इंच, मडगाव २.७४ इंच, धारबांदोडा २.६९ इंच, पणजी २.४४ इंच, दाबोळी २.२९ इंच, केपे १.३७ इंच, काणकोण १.३० इंच, पेडणे १.१८ इंच, सांगे १.१४ इंच, तर म्हापसा येथे ०.७४ इंच पावसाची नोंद झाली.
पडझडीच्या प्रमुख घटना
होली क्रॉस चॅपेल, म्हापसा येथे रस्त्यावर कोसळले झाड.
म्हापसा येथील वृंदावन हॉस्पिटलजवळ झाड घरावर पडण्याच्या स्थितीत.
भुईपाल येथे वीजवाहिनीवर कोसळले आंब्याचे झाड.
२४ तासांत ४४ कॉल्स
अग्निशमन दलाला मागील २४ तासांत एकूण ४४ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ४२ कॉल्स पाऊस व हवामानाशी संबंधित होते. या कालावधीत पावसामुळे सुमारे ४ लाख २३ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर ९ लाख ६० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.