

पणजी: राज्यात पुढील १५ दिवस पाऊस पडला नाही, तरीही पाणीटंचाई भासणार नाही. पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करताना पाणी पुरवठ्याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही, अशी ठोस ग्वाही जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
मान्सून लांबल्याने राज्यातील धरणे आणि नदीपात्रातील उपलब्ध पाणीसाठा किती दिवस उपलब्ध होऊ शकतो, याविषयी जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर आणि पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी संयुक्तपणे शुक्रवारी मंत्रालयात सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
शिरोडकर म्हणाले, की गोव्यातील जलसाठ्यांमध्ये सध्या किमान एक महिन्याची गरज भागविण्याइतपत पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा विभाग (डब्ल्यूआरडी) आणि साबांखा (पीडब्ल्यूडी) १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेतील.
राज्यात आठवड्याभरापासून पावसाचा जोर मंदावला असून उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, येत्या सोमवारी आणि मंगळवारी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ही जारी केला आहे.
सध्या टँकरची गरज नाही : फळदेसाई
मंत्री फळदेसाई यांनी सांगितले, की आतापर्यंत राज्यातील कोणत्याही भागातून पाणी टंचाईची तक्रार आलेली नाही आणि गोव्यात कुठेही पाणीपुरवठा करणारे टँकर्स तैनात करण्याची सरकारला गरज भासलेली नाही.
पाणी जबाबदारीने वापरा : शिरोडकर
पेयजल पुरवठ्याबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही. गोव्याकडे पाण्याचा पुरेसा साठा आहे; परंतु नागरिकांनीही पाण्याचा वापर जबाबदारीने करावा आणि त्याची नासाडी टाळावी, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी केले.
२४-तास हेल्पलाईन!
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, नागरिक ७०३००५५१३६ आणि ७०३००५५०३६ या साबांखाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर पाणीपुरवठा वाहिन्यांच्या गळतीबाबत २४ तासांत कधीही तक्रार नोंदवू शकतात.
राज्यातील पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी आणि टँकरवरील अवलंबित्व संपविण्यासाठी जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कच्च्या आणि शुद्ध पाण्यासाठी स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्याचा विचार सुरू केला आहे.
या माध्यमातून राज्यभरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन आणि वितरणाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. राज्याची सध्याची पाण्याची गरज सुमारे ६५५ एमएलडी आहे आणि त्यात सुमारे ६५ एमएलडी तुटवडा जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी सरकार अतिरिक्त पाणी साठ्याची क्षमता वाढवत आहे. स्वतंत्र जलवाहिनी संकल्पना राबवल्यास दूषित पाणी शुद्ध पाण्यात मिसळण्याचे प्रकार टाळता येतील, असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सरकारी यंत्रणेला आव्हान पेलवणार?
सरकारने प्रक्रिया व कच्चे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या घालण्याचे ठरविले तरी हे काम दिसते तितके सोपे नाही.
जलाशयाच्या ठिकाणी साठवणूक टाक्यांपासून पुरवठा होणाऱ्या गावांतील टाक्यांपर्यंत नवी व्यवस्था उभी करावी लागणार आहे.
दोन्ही प्रकारचे पाणी मोजण्यासाठी स्वतंत्र मीटरची व्यवस्था करावी लागणार आहे. स्वतंत्र जलवाहिन्या घालाव्या लागतील.
त्यासाठी कित्येक ठिकाणी रस्ते फोडावे लागतील. कच्चे पाणी वापरल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर जबाबदारी कोणाची, हा पेच निर्माण होऊ शकतो.
प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी बरेच पाणी कुठे वाहून जाते, याचा शोध घेऊ न शकणाऱ्या सरकारी यंत्रणेला हे आव्हान पेलवणार का, याची शंका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.