Vishwajit Rane on Ambulance in Goa: राज्यात अपघातप्रवण क्षेत्राची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या असलेल्या ‘108 रुग्णवाहिका’ अपुऱ्या पडत आहेत.
अनेकदा या रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहचत नाहीत अशी लोकांची तक्रार आहे, ती दूर करण्यासाठी आणखी नव्या अत्याधुनिक 25रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत.
त्यामुळे अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी विलंब होणार नाही. लोकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.
दोन दिवसांपूर्वी बोर्डे - डिचोली येथे झालेल्या अपघातात ‘108 रुग्णवाहिका’ वेळेत न पोचल्याने एकाचा मृत्यू झाला होता. ही रुग्णवाहिका फोन केल्यानंतर अर्ध्या तासाने घटनास्थळी पोचली होती.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा ‘108 रुग्णवाहिके’ची मोफत सेवा गोव्यात सुरू करण्यात आली, तेव्हा अपघाताचे प्रमाण कमी होते.
आता रस्त्यावरील वाहनांची संख्या तसेच अपघातप्रवण क्षेत्रेही वाढली आहेत. सध्या आरोग्य खात्याकडे 56 रुग्णवाहिका आहेत. त्या अपुऱ्या पडत असल्याने त्याच्या संख्येत वाढ करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कर्मचाऱ्यांची उणीव आहे. काही सेवा कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची गरज आहे. या इस्पितळातील कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी गोमेकॉ इस्पितळाच्या डीनना सूचना करण्यात आली आहे.
गोव्यात आरोग्य मॉडेल पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार करण्यात येत आहे. लोकांचे जीवन वाचवण्याच्या उद्देशाने हे सरकार काम करत आहे, असे राणे यांनी सांगितले.
सामाजिक बांधीलकीच्या योजनेतून (सीएसआर) या नव्या 25 रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या नव्या 108 रुग्णवाहिका अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधायुक्त असतील.
त्यामुळे अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन सेवेवेळी इस्पितळात पोचण्यापूर्वी रुग्णाला प्रथमोपचार या रुग्णवाहिकेतच करण्यात येणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.