Mauvin Godinho: नवेवाडे व महामार्गाला जोडणाऱ्या शांतिनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे मजबुतीकरण व विस्तारीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून त्या पुलावर होणारी वाहनांची कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
या कामासाठी निविदा काढण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर बांधकाम हाती घेण्यात येणार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
शांतिनगर येथील रेल्वे उड्डाण पूल हा माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या प्रयत्नामुळे झाला. त्यामुळे नवेवाडे व शांतिनगर जोडले गेले. या पुलावरून स्कूल बस इतर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते.
हा पूल महामार्गाला जोडला गेल्याने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, पूल अरुंद असल्याने व वाहनांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार सतत घडतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी तेथे नवीन व समांतर असा पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यादृष्टीने मंत्री गुदिन्हो यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने पुलाला मजबूत करून त्याचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रस्तावाला गुदिन्हो यांनी मान्यता दिली आहे.
तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद !
पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्या पुलावरुन दोन वाहने सहजपणे सुटतील. जेणेकरून तेथे होणारी वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होईल. सदर काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत सदर पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.