Valpoi Police Quarters वाळपई येथील पोलिस क्वॉर्टर्सच्या दोन्ही इमारती जर्जर झाल्या असून या इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतींची वेळेवर डागडुजी न झाल्याने त्या खंडर होत चालल्या असून या इमारतींकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
येथील अवर लेडी चर्च समोर मुनिसिपिओ पोलिस क्वॉर्टर्स ही पोर्तुगीजकालीन इमारत व मामलेदार कार्यालयाजवळ असलेली पोलिस क्वॉर्टर्स इमारत या दोन्ही इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुनिसिपिओ पोलिस क्वॉर्टर्स ही इमारत पोर्तुगीज काळात बांधण्यात आली होती. या इमारतीचा ताबा गृह खात्याकडे आहे. वाळपई पोलिस स्थानक स्थापन झाल्यानंतर पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी या इमारती दिल्या होत्या.
सुरवातीच्या काळात मात्र १५ रुपये भाडे आकारण्यात येत होते. म्युनिसिपिओ पोलिस क्वॉर्टर्स या इमारतीत एकूण १८ कुटुंबे वास्तव्यास होती.
पोलिस कर्मचारीच त्या इमारतीची देखरेख करीत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात जुन्या कर्मचाऱ्यांनी या इमारतीवर आपला मालकीहक्क सांगत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
दरम्यानच्या काळात डागडुजी न झाल्याने ही इमारत धोकादायक बनली. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेली कुटुंबे स्थलांतरित झाली. मात्र या इमारतीच्या मालकीबाबतचा खटला आजही न्यायालयात आहे.
सध्या ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत उभी आहे. अनेक वर्षे डागडुजी न झाल्याने छत व इतर भाग कोसळू लागला आहे. ही इमारत मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने धोका अधिक वाढला आहे. तसेच या इमारतीनजीक असलेल्या घरांनाही धोका आहे. सध्या या इमारतीवर झाडे झुडपे वाढलेली दिसून येत आहेत.
गृह खात्याने तातडीने या इमारतीसंबंधी ठोस पाऊल उचलून ही इमारत तोडून दुसरी बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा अथवा ज्यांनी या इमारतीसंबंधी खटला दाखल केला आहे, त्यांना मालकीहक्क बहाल करून या इमारतीसंबंधी उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.
मामलेदार कार्यालयाजवळ असलेली पोलिस क्वॉटर्स इमारतही खंडर होत चालली असून ही इमारत धोकादायक झाल्यानंतर ही इमारत खाली करण्यात आली होती. या ठिकाणी नवी इमारत उभारावी, अशी पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी असून अजून हा प्रस्ताव पुढे गेलेला नाही.
वाळपईतील पोलिसांची गैरसोय
वाळपईतील दोन्ही पोलिस क्वॉर्टर्स इमारती जर्जर झाल्याने सध्या येथे सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासाची कोणतीही सोय नाही. वाळपईत पोलिस स्टेशन तसेच पोलिस प्रशिक्षण केंद्रही कार्यरत असल्याने येथे सेवा देणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे.
मात्र त्यांच्यासाठी निवासी गाळे (क्वॉटर्स ) उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही पोलिस कर्मचारी परिसरात भाडेपट्टीवर घर घेऊन राहतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दोन्ही इमारतीसंबंधी ठोस निर्णय घेऊन पावले उचलणे आवश्यक आहे.
वाळपई म्युनिसिपिओ पोलिस क्वॉर्टर्सची इमारत धोकादायक स्थितीत उभी आहे, ती कधीही कोसळू शकते. शहराच्या मध्यभागी तसेच रस्त्याच्या बाजूला ही इमारत असल्याने धोका अधिक आहे.
सध्या इमारतीचे छत व इतर भाग कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ही इमारत कोसळून मोठा अपघात घडला तर याची जबाबदारी कोण घेणार? सरकारने या इमारतीबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
- अनिरुद्ध जोशी, नागरिक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.