पणजी: देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपचे संस्थापक अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी (Former Prime Minister and founding president of BJP Atal Bihari Vajpayee) यांचे देशाच्या राजकारणात मोठे योगदान आहे. त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे (BJP state president Sadanand Shet - Tanawade) यांनी केले. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त भाजपच्या पणजी मुख्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिरीश उसकैकर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तानावडे म्हणाले, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्यकर्तृत्व खूप मोठे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते संस्थापक सदस्य आणि भाजपचे संस्थापक अध्यक्ष होते. लोकसभेवर 10 वेळा आणि राज्यसभेवर 2 वेळा ते निवडून गेले होते. भारतीय राजकारणात त्यांनी सुमारे पाच दशके आपल्या कामाचा ठसा उमटविला. तसेच ते तीनवेळा पंतप्रधान झाले. सुरुवातीच्या दोन टर्म छोट्या झाल्या. पण तिसरी टर्म त्यांनी पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला, असे ते म्हणाले.
आज आपण देशभरात पाहत असलेला महामार्ग विकास त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाला. १९७७ मधील मोरारजी देसाई यांच्या सरकारात ते देशाचे परराष्ट्रमंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी उत्तम नेता, उत्कृष्ट वक्ता, संवेदनशील कवी आणि लेखक ही होते. हळव्या मनाच्या वाजपेयी यांनी सत्तेत असो वा विरोधात संसदेतील प्रत्येक टर्म गाजवून सोडली. आजच्या तरुणांनी त्यांचे कार्य आणि विचार आत्मसात करावेत, असे आवाहन श्री तानावडे यांनी केले.
२००२ मध्ये वाजपेयी यांची झालेली जाहीर सभा विक्रमी ठरली होती. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता आली. त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने देशातील अनेक जाहीर सभा अक्षरशः गाजवल्या. त्याकाळी आम्हाला मतदानाचा हक्क नसतानाही आम्ही केवळ वाजपेयी यांना ऐकण्यासाठी जात होतो. वाजपेयी यांची आज तिसरी पुण्यतिथी. यानिमित्त आपण सर्वजण देशाप्रती आणि पक्षाप्रती एकसंध होऊया आणि त्यांना आदरांजली वाहूया, असे तानावडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.