

वाळपई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज वाळपई आणि परिसरातील भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सर्वांना सुखद धक्का दिला. या पावसामुळेउकाड्याने त्रस्त असलेल्या गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मंगळवारचा बाजार असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून वाळपईमध्ये पारा कमालीचा वाढला होता. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते आणि नागरिक घामाघूम होत होते. पंखे आणि वातानुकूलित यंत्रणांमधूनही गरम हवा येत असल्याने नागरिक पावसाची प्रतीक्षा करत होते. आज अचानक आकाशात ढग जमा झाले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हवेत गारवा पसरला असून निसर्गाचे रूपही पालटले आहे. कडक उन्हामुळे करपून गेलेल्या झाडांनाही या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे.
वाळपईमध्ये दर मंगळवारी साप्ताहिक बाजार भरतो. आज सकाळपासूनच शेजारील गावांमधून नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात आले होते. दुपारच्या वेळी जेव्हा बाजार रंगात आला होता, तेव्हाच अचानक पावसाने हजेरी लावली.
अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापाऱ्यांची मालाचे नुकसान टाळण्यासाठी धावपळ उडाली. फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि कापड व्यापाऱ्यांची प्लास्टिकचे कागद शोधताना मोठी तारांबळ उडाली. पावसापासून वाचण्यासाठी ग्राहकांनीही जवळच्या दुकानांचा आणि शेडचा आधार घेतल्याने काही काळ बाजारात गोंधळाचे वातावरण होते.
हा अवकाळी पाऊस जरी नागरिकांना थंडावा देणारा ठरला असला, तरी बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या आंब्याचा आणि काजूचा हंगाम ऐन भरात असल्याने, या पावसाचा फटका या पिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.