पर्वरी : मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा एकमेव केंद्रबिंदू डोळ्यांसमोर ठेवून २०१२ साली हळदोणा मतदारसंघाचे (Aldona Constituency) विभाजन करून पर्वरी (Porvorim) हा स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आला व त्यात सुकूर, पेन्ह-द-फ्रान्स आणि साल्वादोर-द-मुन्द (Salvador Du Mund) या तीन पंचायतींचा समावेश केला आहे. आज बार्देश (Bardez) तालुक्यातील सात मतदारसंघांपैकी पर्वरी हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गणला जात आहे. परंतु, या मतदारसंघात निर्माण होणाऱ्या अनिर्बंधित काँक्रिटच्या जंगलाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे.
पर्वरी कालची व आजची...
सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी पिळर्ण, बिठ्ठोण, पैठण या भागांतील लोक स्वत:ची गुरे-ढोरे पर्वरीतील खडकाळ परिसरात चरायला आणायचे. खडकाळ भाग असल्याने येथे कोणीच जमीन खरेदी करायला पुढे येत नसत. पण, आज येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सर्वत्र काँक्रिटचे जंगल झाले आहे.
परप्रांतीय मजूर, झोडपट्ट्याही वाढल्या
पर्वरी परिसर तीन पंचायतींमध्ये विभागला गेल्याने हा भाग आजही अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. जो तो स्वत:च्या मर्जीने परवाने देत असतो. त्याबाबत कोणीच उपलब्ध साधनसुविधांच्या निर्माणाचा विचार करीत नाही. त्यामुळे त्याचा थेट त्रास पर्वरीवासीयांना होत आहे. दिवसेंदिवस इमारती उभ्या राहत असल्याने परप्रांतीय मजूरही येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या उभारून दाटीवाटीत राहत आहेत. काही लोकप्रतिनिधी राजकीय लाभ उठवण्यासाठी त्यांना आधार कार्ड, घर क्रमांक अशा सोयी पुरवून त्यांची पाठराखण करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणे, चोऱ्या, वाटमारी अशा घटनाही या भागांत वाढत आहेत.
नियोजनबद्ध आराखडा हवा
पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील समस्येने तर पर्वरीवासीयांचे जिणे हैराण केले आहे. लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या पाणी साठवण्याच्या टाक्यांची संख्या वाढलेली नाही. त्याचबरोबर खात्यातील लोकच पाण्याचा काळा बाजार करतात, असा कथित आरोप आहे. शहरांप्रमाणेच येथे इमारती, आस्थापने दिवसेंदिवस वाढत आहेत; पण, आपत्कालीन सेवेसाठी अग्निशामक दलाने तिथे कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे अचानक आगीसारख्या दुर्घटना घडल्या तर म्हापसा, पिळर्ण किंवा पणजी या ठिकाणांहून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. शिवाय मोबाईल टॉवर, मोकाटपणे फिरणारी गुरे व कुत्रे या समस्याही डोके वर काढीत आहेत. पर्वरीतील विविध समस्या निकालात काढण्यासाठी सर्व पंचायतींनी एक व्यापक बैठक घेऊन पर्वरी मतदारसंघासाठी नियोजनबद्ध आराखडा करणे गरजेचे आहे.
महामार्ग ओलांडणे ठरते दिव्यच!
या भागातून म्हापसा-पणजी राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आहे. या ना त्या कारणाने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना हा महामार्ग ओलांडावा लागतो; पण, तो ओलांडताना त्यांना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे दर दिवशी एक दोन छोटे-मोठे अपघात तिथे होतातच. यावर उपाय म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवून तिथे रस्ता द्विभाजक उभारणे, काही ठिकाणी गतिरोधक उभारणे, तसेच नियोजित उड्डाणपुलाच्या कामाला तेजगतीने चालना देणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.