गोवा विद्यापीठाच्या घसरत असलेल्या दर्जाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन व इतर प्राध्यापकांची कानउघाडणी करून अजून महिना लोटलेला नाही. अशातच, गोवा फॉरवर्डच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाने परराज्यातील प्राध्यापकांना नियुक्ती करण्यासाठी केलेल्या कारनाम्याचे पितळ सर्वांसमोर उघड करत कुलगुरूंना जाब विचारला. गोवा विद्यापीठ स्वायत्त संस्था असल्याप्रमाणे हवा तो निर्णय घेऊ शकत नाही. गोव्यात सरकारी नोकरीसाठी गोव्यातील पंधरा वर्षे निवासाचे प्रमाणपत्र तसेच कोकणी या राजभाषेच्या ज्ञानाची अनिवार्यता असणे गरजेचे आहे. असे असूनही या नियमांना डावलून परराज्यातील खासकरून आपल्या मर्जीतील प्राध्यापकांना विद्यापीठात नेमण्यासाठी सुरू असलेला खटाटोप गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सावंत स्वतः परप्रांतीय गोमंतकीयांच्या व्यवसायात घुसखोरी करत असल्याचे सांगतात, तर त्यांच्याच राज्यात तेही गोवा विद्यापीठासारख्या संस्थेत परराज्यातील प्राध्यापकांना नेमण्यासाठी उलटे फासे फेकले जात आहेत. याबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून मुख्यमंत्र्यांनी याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा.... गोवा विद्यापीठातील विद्यमान कुलगुरू म्हणजे ‘कानामागून आला,अन् तिखट झाला’, अशी गत झाल्यावाचून राहणार नाही. ∙∙∙
राज्यात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात आहे. वारंवार त्याबाबत सरकारी पातळीवरून चर्चाही होत आहे. सरकार मद्यपी चालकांमुळे अपघात वाढताहेत, असाही दावा करते. त्यात तथ्य असेलही. पण रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना कोण जबाबदार असा सवाल सामान्यांकडून केला जात आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत बहुतांश अपघात स्वयंअपघातच असतात. त्यामुळे तक्रार तरी कोणाविरोधात करावी, असाही प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा असूदेच खड्ड्यांपासून सुरक्षा कधी? ∙∙∙
पणजीत गुरूदास सावळ यांच्या एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप हे पेडण्याची भाषा शैली बोलून दाखवता दाखवता थेट सिंधुदुर्गात पोहोचले. ते जी पेडण्याची शैली म्हणून बोलत होते, ती सिंधुदुर्गमधील होती, किंवा फारतर सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या काही गावांत बोलली जाणारी बोली होती.गुरुदास सावळ यांचा ‘खाजन्याचो झिलगो’ असा उल्लेख त्यांनी केला. त्या खाजने गावात आताच नव्हे, तर खाजने येथील या अगोदरच्या कित्येक पिढ्याही झिलगो किंवा भाई खलप पेडणेची शैली म्हणून जे काही बोलले ती भाषा अगोदर कधी बोललेले नाहीत. ज्या मांद्रे मतदारसंघातून अनेकदा निवडून आले, त्या मतदारसंघातील जे अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेही भाई खलप पेडण्याची शैली सोडून सिंधुदुर्गात कसे काय पोहचले, असे म्हणत होते. शेवटी मांद्रेत म्हणा किंवा पेडण्यात राहून भाईंना पेडण्याची भाषाच समजली नाही, अशीही चर्चा होती. ∙∙∙
फोंड्यात सध्या रायझिंग फोंडा, प्रोग्रेसिव्ह फोंडा, फोंडा फर्स्ट, शायनिंग फोंडा अशा अनेक संस्था, संघटना नेत्यांनी काढल्या असून याद्वारे समाजकार्य सुरू आहे. मात्र, या संस्था संघटना किती काळ तग धरतात, त्याकडे फोंडावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. काहींना अनेक वर्षे झाली आहेत, तर काही नव्याने सुरू झाल्या आहेत, या संस्थांना शुभेच्छाच...! मात्र अशा संस्थांकडून जे मिळेल ते घेऊया संस्था कोणत्याही राजकारण्याची का असेना उद्याचे उद्या...असाही विचार काही लोकांकडून केला जात आहे, हेही तेवढेच खरे! ∙∙∙
रवींद्र भवनात सुरू असलेल्या ‘कलारंग’ महोत्सवाच्या उदघाटन समारंभाला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी गीत म्हणायला सांगितले. वर्षा आणि हेमा लहान असताना एकाच गुरुंकडे संगीत शिकायच्या. त्यामुळे कदाचित हेमाला वर्षाची गाण्याची ताकद माहीत असावी. वर्षानेही ज्ञानेश मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या कोकणी चित्रपटात आपण भूमिका केली होती. तो आपला पहिला चित्रपट असल्याचेही सांगितले. वर्षा यांनी त्याच चित्रपटातील कोकणी गाणे सुरेलपणे सादर केले. आपल्याला एरव्ही गायिका, नृत्यांगना होण्याची हौस होती. पण नंतर अभिनयाकडे आपण वळले, असेही तिने सांगितले. जर आपण गायिका किंवा नृत्यांगना बनले असते, तर आपल्याला स्वतंत्र कार्यक्रम करण्याची संधी मिळाली असती, असे मनोगत वर्षा यांनी याप्रसंगी व्यक्त केले. काहीही असो वर्षा यांच्या अभिनयाचा अनुभव सर्वांनाच आहे, पण या कार्यक्रमात उपस्थितांना तिच्या गाण्याचा दर्जा व तिचे अस्सल कोकणीतील भाषण ऐकण्याचीही संधी मिळाली, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙
केपे पालिकेतील एक गोष्ट सध्या भलतीच चर्चेत आहे. केपे पालिकेने एका प्रभागात दोन विकासकामे हाती घेतली होती. यासाठी जमीन मालकाने त्यांना सुरवातीला ‘एनओसी’ही दिली होती. ही कामे देण्याचे आश्वासन देऊन त्या स्थानिक नगरसेवकाने एका कंत्राटदाराला दिले होते. त्यामुळे तो कंत्राटदारही खुशीत होता. पण मध्यंतरी काय झाले कुणास ठाऊक त्या जमीन मालकाने विकास कामासाठी दिलेली एनओसी अकस्मात मागे घेतली. त्यामुळे ही विकासकामे प्रत्यक्षात उभी राहूच शकली नाहीत. पण या सर्व झमेल्यात तो कंत्राटदार मात्र अडकल्याचे समजते. कारण त्या नगरसेवकाने म्हणे तुला कंत्राट मिळवून देतो असे सांगून त्याच्याकडून आगाऊ पैसे स्वत:ला मागवून घेतले होते. त्यामुळे त्या कंत्राटदाराची गत सध्या कामही नाही, आणि पैसेही गेले, अशी झालेली आहे. त्या नगरसेवकाने आपले पैसे द्यावे, यासाठी तो कंत्राटदार त्याचे उंबरठे झिजवू लागला आहे. ∙∙∙
भंडारी समाजातील व्यक्तीने इतर जाती वा धर्मातील व्यक्तीशी विवाह केला तर त्या व्यक्तीला समाजाच्या संघटनेत पदाधिकारी होता येणार नसल्याची घटना दुरूस्ती गोमंतक भंडारी समाज संस्थेने केली आहे. याची मोठी चर्चा भंडारी समाजाच्या युवा वर्गात सुरू आहे. समाजातील बहुतांश सुशिक्षित तरुण तरुणींनी जातीच्या चौकटी ओलांडून आपल्याला मनपसंत जीवनसाथी निवडलेला आहे. त्यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या या समाज संस्थेचे आम्ही सभासद तरी का व्हावे, अशी चर्चा त्यांनी सुरू केली आहे. या गटात येणारे याविषयावर गेले काही दिवस चर्चा करत आहेत. केवळ परजातीतील किंवा पर धर्मातील जीवनसाथी निवडला म्हणून आम्हाला बहिष्कृत करण्यात येत असेल तर आम्ही नवी समाज संघटनाच का स्थापन करू नये, अशी विचारणा ते सध्या करताना दिसत आहेत. सध्या असलेल्या समाज संघटनेवर सत्ता असलेल्यांना शह देण्यासाठी समांतर अशी समाज संघटना स्थापन करण्याचा विचार मध्यंतरी बळावला होता. त्याला सत्ताघारी गटाला विरोधाची किनार होती. आता जाती, धर्माच्या सीमा ओलांडलेल्यांचाही समावेश त्यात झाला आहे. त्यामुळे भंडारी समाज राजकीय शक्ती म्हणून एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आता नवी संघटना स्थापन करावी काय हा विचारही डोकावू लागला आहे.
मांडवी नदीत तरंगणारा मृतदेह सायंकाळी ५.३०च्या सुमारास आढळला. त्यानंतर तो मृतदेह नदीबाहेर काढण्यास रात्रीचे ९.३० वाजले. यावरून आपत्ती व्यवस्थापन किती सक्षम आहे याचे दर्शन शुक्रवारी सर्वांना झाले. ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी काय काय केले याचा पाढा वाचला जातो. साधी नौका आणून तो मृतहेद किनाऱ्यावर आणण्यासाठी राजधानीत तीन चार लागावेत याचे समर्थन केलेच जावू शकत नाही. सरकार कसे चालते याचे हे चपखल उदाहरण असल्याची चर्चा होतेय.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.