Goa Trip Scam: सोशल मीडियावर मैत्री झाली, गोव्याला फिरायला बोलावलं, व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल; अहमदाबादच्या वकिलाला 20 लाखांना गंडा
Ahmedabad Lawyer Scam: सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अहमदाबादमधील नामांकित वकिलाला तब्बल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमवावी लागली आहे. एका तरुणीने स्वतःला 'थेरपिस्ट' असल्याचे भासवून या वकिलाला गोव्याला फिरायला बोलावले आणि तिथे त्यांच्या खासगी क्षणांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित वकिलाने अहमदाबादच्या एलिसब्रिज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस तपास करत आहेत.
पीडित वकील एका प्रसिद्ध वकिलातीचे काम पाहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची एका तरुणीशी सोशल मीडियावर (Social Media) ओळख झाली. तिने स्वतःची ओळख एक थेरपिस्ट म्हणून दिली. दोघांमध्ये बोलणे वाढले आणि मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेत त्या तरुणीने त्याला भेटण्यासाठी गोव्याला येण्याची ऑफर दिली. सुरुवातीला वकिलाने टाळाटाळ केली, पण तिने केलेल्या आग्रहमुळे तो तयार झाला.
गोव्याच्या हॉटेलमध्ये गुपचूप रेकॉर्डिंग
दोघेही गोव्याला (Goa) गेले आणि एका हॉटेलमध्ये थांबले. तिथे त्यांना कल्पनाही नव्हती की त्याच्यासोबत काय घडणार आहे. त्या तरुणीने त्याच्या परवानगीशिवाय आणि त्याला कोणतीही कल्पना न देता त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले. या व्हिडिओचा वापर करुन ती त्याला नंतर ब्लॅकमेल करणार होती, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. गोव्यातील काही दिवस घालवल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले.
त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीने वकिलाला ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठवले. तिने ते व्हिडिओ सोशल मीडियावर आणि त्याच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या वकिलाने तिने सांगितल्याप्रमाणे तिला पैसे द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने काही हजार रुपये मागितले. वकिलाने बदनामीच्या भीतीपोटी ते पैसे दिले. मात्र, एकदा पैसे मिळाल्यानंतर तिने वारंवार पैशांची मागणी केली आणि ही मागणी वाढतच गेली.
20 लाखांपेक्षा जास्त रकमेची खंडणी
हजारोंनी सुरु झालेली ही रक्कम लाखोंमध्ये पोहोचली. भीतीपोटी वकील तिला वेळोवेळी पैसे देत राहिला. मात्र, जेव्हा ही रक्कम 20 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आणि त्या महिलेची पैशाची मागणी थांबत नव्हती, तेव्हा वकिलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने हिंमत करुन पोलिसांशी संपर्क साधला.
वकिलाने अहमदाबादच्या एलिसब्रिज पोलीस ठाण्यात या फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, हे सायबर फसवणुकीचे प्रकरण आहे आणि यामागे एखादी मोठी टोळी असू शकते. पोलीस त्या महिलेच्या बँक खात्यांचे आणि सोशल मीडिया प्रोफाइलचे विश्लेषण करत आहेत. तिच्या लोकेशनचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात आहे.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
अशा प्रकारच्या घटना पुन्हा-पुन्हा घडत आहेत. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे आणि त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवणे हे धोकादायक ठरु शकते. या घटनेमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, डिजिटल युगात अनोळखी व्यक्तींबरोबर कोणताही व्यवहार करताना किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
अहमदाबाद पोलिसांनी जनतेला आवाहन केले की, अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. कारण, वेळ गमावल्यास गुन्हेगारांना पकडणे अधिक कठीण होते. या प्रकरणातील आरोपी महिला लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, अशी आशा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

