Goa Traffic Police : दंड भरण्यासाठी रोख रक्कम नसल्यास वाईन शॉपमध्ये दंडाची रक्कम गुगल पे करा, असा कोलवा वाहतूक पोलिसांचा दंड वसुलीचा अजब प्रकार समोर आला. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी एका वाहनचालकाला वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला. मात्र त्याच्याकडे रोख रक्कम नसल्याने जवळच्या वाईन शॉपमध्ये दंडाची रक्कम गुगल पे करा असा सल्ला त्याला कार्यरत असलेल्या होमगार्डने दिला व दुचाकीची चावी काढून घेतली.
या प्रकारामुळे राज्यातील वाहतूक पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दंड न भरल्यास वाहनचालकाला पोलिस कोठडीत डांबण्याची धमकीही देण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याला दंडाची पावती देखील देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र नसल्याच्या कारणाने त्या वाहनचालकाला 5 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आले. तडजोडीनंतर सौदा 1 हजार रुपयांवर आला.
प्रकरण पोलिस महासंचालकांपर्यंत जाणार
धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीचालकाने भरलेल्या दंडाची पावतीही त्याला देण्यात आली नाही. चालकाच्या वडिलांनी याप्रकरणी संबधित वाईन शॉपमालकाशी संपर्क करून दिलेल्या पैशांबाबत चौकशी केली असता, पोलिसांनी ते परत घेतल्याचे त्यांना समजले.
आपण हे प्रकरण पोलिस महासंचालकांच्या कानावर घालून या प्रकरणात गुंतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.