पणजी : रक्षाबंधन ते पारसी दिनाची सुटी असा मोठा विकेंड मिळाल्याने राज्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली असून शनिवारी गोवा ‘जॅम पॅक’ झाल्याचे चित्र दिसून आलेे. हवाई, रेल्वे, बस आणि स्वतःची वाहने घेऊन सुमारे दहा लाख पर्यटक गोव्यात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर आज वाहतूक कोंडी झाल्याने लोक वैतागले. त्यातच अनेक ठिकाणांहून पोलिस गायब झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला दिसून आला.
मोठा विकेंड असल्याने राज्यात पर्यटक वाढणार, असा अंदाज यापूर्वीच ‘गोमन्तक’ने वर्तवला होता. आठ दिवसांपूर्वीच राज्यातील हॉटेल, रिसॉर्टचे बुकिंग झाले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गोव्यातच साजरा करण्यासाठीही बहुतांश पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली आहे. त्यामुळे विमानांचे तिकीटर दर आभाळाला भिडले आहेत. रेल्वे खचाखच भरल्या होत्या. नेमकी हीच संधी साधून खासगी बसेसचे दरदेखील तिप्पटीने वाढवण्यात आले होते. त्यामुळे गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक येणार असल्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले होते.
शेजारच्या राज्यातील लोक आपली खासगी वाहने घेऊन येणार याची कल्पना असतानासुद्धा आज राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस उपलब्ध नव्हते. वाहतूक कोंडीत दीड ते दोन तास अडकल्याने लोकांची प्रचंड गैरसोय झाली. वाहतूक व्यवस्थापनासाठी अनेक ठिकाणी पोलिस अनुपलब्ध असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
खरे तर विकेंडला पर्यटक मोठ्या संख्येने गोेव्यात येणार, हे माहीत असूनही सरकारच्या वाहतूक खात्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही, ही धक्कादायक बाब आहे. त्यातच प्रमुख रस्त्यांवर पोलिस उपस्थित नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. खासकरून पणजी, पर्वरी आणि किनारपट्टी भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि स्थानिकांची गैरसोय झाली. पणजीतील तरंगते कॅसिनो हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असल्याने पणजी शहरात पर्यटक मुक्काम करणार आहेत. मंगळवारी पारसी दिन असून महाराष्ट्रात सुट्टी असल्याने तेथील पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत, अशी माहिती गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेचे अध्यक्ष नीलेश शाह यांनी दिली.
प्रमुख रस्त्यांवर चक्का जाम; रहदारीच्या ठिकाणी पोलिस गायब; स्थानिकांची घुस्मट
मोठा विकेंड असल्याने पर्यटक येणार, हे अपेक्षित होते. त्यातच गोव्यातील लोक शनिवारी आपल्या गावाला जातात. यादिवशी नेहमी वाहतूक जास्त प्रमाणात असते. त्यामुळे झुआरी पूल, कुठ्ठाळी आणि आगशीपर्यंत वाहतूक कोंडी झाली. मी संपूर्ण दिवस कुठ्ठाळी जंक्शनवर सुमारे 25 पोलिस कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक व्यवस्थापन करत होतो.
- धर्मेश आंगले, उपअधीक्षक, दक्षिण गोवा.
हॉटेल्स बुकिंग फुल्ल; विमानाचे दर गगनाला
राजधानीतून पोलिस गायब : शनिवारी सकाळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जुन्या सचिवालयाकडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून रॅलीच्या मार्गावर तसेच अन्यत्र पोलिस आणि वाहतूक पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले होते.
मात्र, ही रॅली संपल्यावर ही फौज कुठे गायब झाली कोणालाच कळेना. दुपारी 12 वाजता मेरशी जंक्शन, बस स्थानक परिसर तसेच दयानंद बांदोडकर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी एकही पोलिस उपलब्ध नव्हता.
पर्वरीत ‘चक्का जाम’
शनिवारी पर्वरीत पणजी-म्हापसा हमरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संध्याकाळी अनेक वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बराच वेळ ताटकळत राहावे लागले. ओ कोकेरो जंक्शन हे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्रस्थान ठरले.
राज्यातील 95 टक्के हॉटेल्स भरली असून, शहरी भागांमध्ये हॉटेल्सना याचा फायदा झाला आहे. मोठा विकेंड असल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटक राज्यात आले आहेत. अनेक लोक स्वत:ची वाहने घेऊन आले आहेत.
- नीलेश शाह, अध्यक्ष, टीटीएजी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.