Valpoi News : इतिहासाला उजाळा देणारी सात भाव घोडेमोडणी : विश्वजीत राणे

Valpoi News : ठाणे-सत्तरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला
Valpoi
Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News :

वाळपई, ठाणे-सत्तरी येथील प्रसिद्ध घोडेमोडणी ही इतिहासाला उजाळा देणारी असून राज्यात एकमात्र अशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जातो.

या गावाच्या पूर्वजांनी ही परंपरा टिकवून ठेवली. भविष्यातही हे महत्त्व अबाधित राखण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

शुक्रवारी (ता.२९) रात्री ठाणे-सत्तरी येथे पार पडलेल्या प्रसिद्ध त्रैवार्षिक सात भाव घोडेमोडणी उत्सवात श्री मंडळगिरो कोळगिरो देवस्थानात भेटीवेळी आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे, सात भाव समितीचे पदाधिकारी पांडुरंग गावकर, नीलेश परवार, सरिता गावकर, तनया गावकर, अनुष्का गावस, सुचिता गावकर, विनायक गावकर, सुरेश आयकर, सुभाष गावडे, सोनिया गावकर तसेच इतरांची उपस्थिती होती. यावेळी राणे दाम्पत्याने सुरवातीस मंडळगिरो कोळगिरो देवाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर घोडेस्वारांची विधीवत पूजा केली.

आमदार डाॅ. दिव्या राणे म्हणाल्या की, मंडळगिरो-कोळगिरो देवस्थान हे जागृत देवस्थान असून निर्सगाच्या सान्निध्यात वाघेरी डोंगराच्या व सह्याद्रीच्या कुशीत पावन झालेल्या या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. शिमगोत्सवादरम्यान साजरे होणारे होलिकोत्सव, चोरोत्सव, करवल्यो आणि घोडेमोडणी यासारख्या विधीपरंपरांमुळे आपली संस्कृती समृद्ध होते.

दर दुसऱ्या वर्षी होणाऱ्या या महोत्सवात १४ नाचणाऱ्या घोड्यांचा मनमोहक देखावा दाखवला जातो आणि तो पाहणाऱ्या सर्वांची मने मंत्रमुग्ध होतात. मनोकामना पूर्ण होईल असे मानणारे भाविक येथे प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात आणि याचे भाग्य आम्हाला लाभले.

गोमंतकाच्या सांस्कृतिक व पारंपरिक इतिहासात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सवाला शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी ७ वाजता सुरवात झाली.

सात गावांतील घोड्यांची हातभेट झाल्यानंतर ठाणे पंचायत क्षेत्रातील पंचायतीसमोर मंडळ व कोळगिरो या मैदानावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या साक्षीने १४ घोड्यांचा नृत्यप्रकार पाहण्याची संधी पारंपरिक घोडेमोडणी उत्सवात पाहायला मिळाली.

राणे दाम्पत्याला पूजेचा मान

सात गावांची नवी ओळख प्राप्त झालेला हा पारंपरिक उत्सव म्हणजे गावातील नागरिकांसाठी एक सांस्कृतिक मेळावा असतो. यावेळी नागरिकांची विशेष अशी एकजूट पाहायला मिळते. हा सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

या सोहळ्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी उपस्थित राहून घोड्यांची पूजा करण्याचा मान मिळवला.

चौदा घोड्यांचा नृत्याविष्कार

गोमंतकाच्या पारंपरिक इतिहासात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या घोडेमोडणी उत्सवाचे आयोजन दर तीन वर्षांनी होत असते. सात भावांची घोडेमोडणी अशी नवी ओळख निर्माण झालेल्या या सोहळ्याला गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक आदी राज्यांतून तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

महत्त्वाचे म्हणजे ठाणे, पाली, हिवरे-खुर्द, हिवरे-बुद्रुक, चरावणे, गोळावली, रिवे आदी सात गावांतील चौदा घोड्यांचा संगम साधणारा पारंपरिक नृत्याविष्कार पूर्ण रात्रभर पाहावयास मिळाला. हा पारंपरिक सोहळा शेकडो वर्षांपासून सुरू असून राज्याच्या संपूर्ण भागात त्याला विशेष असे महत्त्व आहे.

Valpoi
Goa Politics: मुख्यमंत्र्यांना पत्नीसह अटक करा; आप’ची मागणी

देवदर्शनासाठी गर्दी

नवसाला पावणारा कोळगिरो व मंडळगिरो हे देवस्थान भागातील सात गावांसाठी पूज्य मानले जाते. हे देवस्थान जागृत असल्याने सांगलेला नवस या दिवशी फेडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्यामुळे हा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी देवदर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

पारंपरिक सोहळा रात्रभर चालल्यानंतर शनिवारी पहाटे ४ वाजता भागातील मंदिरासमोरील होळीकडे घोड्यांचा नृत्याविष्कार होऊन त्यानंतर धार्मिक प्रक्रिया पूर्ण करून मांसाहारी जेवणानंतर उत्सवाची सांगता करण्यात आली. ‍

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com