Foreign Tourists Visiting Goa राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर सरकार पर्यटन क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुलावर लक्ष केंद्रीत करत आहे. गोवा हे जगाच्या नकाशावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने विदेशी पर्यटक येतात.
मात्र, कोविडनंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली.
या उत्तरात २०१९ ते २०२२ या कालावधीत राज्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची आकडेवारी दिली आहे. रशिया, इंग्लंड, युक्रेन, पोर्तुगाल, कझाकिस्तान आणि अमेरिका या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रशिया आणि इंग्लंडमधून २०१९ च्या पर्यटन हंगामात लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. मात्र, चार वर्षांच्या कालावधीनंतर ही संख्या हजारांत पोहचली. युक्रेन, पोर्तुगाल, कझाकिस्तान आणि अमेरिकेतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
राज्याचा महसूल हा खाण व्यवसाय तसेच पर्यटनावर पूर्ण अवलंबून होता. खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर त्याची भिस्त पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलावरच होती. मात्र, कोविडनंतर परदेशी पर्यटकांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
रशिया व इंग्लंडमधील पर्यटकांची संख्या कमी झाल्याने राज्याला मोठा फटका बसला आहे. चार्टर विमाने येत असली तरी त्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने त्याचाही परिणाम झाला आहे.
विदेशात ‘रोड शो’चे आकर्षण
पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळावा, अशी अपेक्षा आहे. यासाठी दर्जेदार व चांगले पर्यटक जे पैसे खर्च करतात, ते गोव्यात येणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्यात आवश्यक त्या साधनसुविधा उभारून विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी परदेशात रोड शोद्वारे गोव्यातील पर्यटनाचा प्रसार करत आहेत.
पर्यटनाला उतरती कळा
२०१९ साली ९,३७,११३ विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. २०२० मध्ये त्यात घट होऊन हा आकडा ३,००,१९३ इतका झाला. २०२१ मध्ये तर केवळ २२,१२८ पर्यटक गोव्यात दाखल झाले. त्यानंतर २०२२ मध्ये कोणतेही निर्बंध नसल्याने १,६९,००५ विदेशी पर्यटक गोव्यात आल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.