Goa Tourism: अन् पर्यटनमंत्र्यांनी बदलली भाषा 'खरी कुजबूज'

Goa Tourism: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री खंवटे यांची बैठक झाल्यानंतर मंत्रिमहोदयांची भाषाच बदलली.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Goa Tourism: राज्यातील किनारी भागांमध्ये पर्यटन व्यवसायात प्रचंड प्रमाणामध्ये बेकायदेशीर बाबी घडत असून याला केवळ पोलिसच जबाबदार आहेत, असे म्हणत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर आगपाखड केली होती.

मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री खंवटे यांची बैठक झाल्यानंतर मंत्रिमहोदयांनी अचानक भाषाच बदललेली दिसली. त्यामुळे गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नक्की काय डोस दिला, याबाबत जनता अनभिज्ञ असली तरी या ‘घुमजाव’ची जोरदार चर्चा सुरू आहे.

शेत कसण्याचे श्रेय ‘आयआयटी’ला

सांगे तालुक्यात वेगळीच किमया घडून आली आहे. तेथे कित्येक वर्षे पडीक असलेली शेतजमीन आता शेतकऱ्यांनी कसायला सुरुवात केली आहे. यामागे त्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक हित असले, तरी आताच त्यांनी शेतजमीन कसायला घेण्यामागेही मोठे रंजक कारण आहे. सांगे तालुक्यातील काही गावांमधील जमीन आयआयटी प्रकल्पासाठी जाणार आहे.

यासाठी तेथील काही शेतकऱ्यांनी आंदोलनही सुरू केले आहे. परंतु सरकारने खासकरून तेथील आमदारांनी काहीही झाले, तरी आयआयटी सांगेतच उभारण्याचा मनोदय व्यक्त केल्याने या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यावर त्यांनी आपणही काही कच्च्या गुरूचे चेले नाही आहोत, हे दाखवून दिले आहे.

या शेतकऱ्यांनी इतकी वर्षे पडीक असलेली जमीन कसायला सुरुवात केल्याने सरकार त्यांची जमीन बळकवायला आल्यास त्यांना आपली बाजू मांडणे सोपे होणार आहे. त्यावेळी या शेतकऱ्यांवर जमीन देण्यासाठी सक्ती केल्यास सरकारच ‘व्हिलन’ ठरणार आहे. काहीही असो, निदान आयआयटीच्या निमित्ताने का होईना, शेतकरी शेतात उतरले, याचे श्रेय आयआयटीला जाते.

Rohan Khaunte
Goa Weather: गोव्यात 'या' दिवशी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

काय? प्रकाश सर सिनेमात?

‘जगी अशक्य असे काहीही नाही’ असे म्हणतात ते खरेच आहे. जर आपल्याकडे जिद्द व चिकाटी असेल तर आकाशालाही गवसणी घालणे शक्य आहे. माजी शिक्षणमंत्री तथा ‘उटा’ संघटनेचे नेते प्रकाश वेळीप हे आपणास माहीत असतीलच. ते अमेरिकेत विश्व मराठी साहित्य संमेलनाला गेले होते. त्यांनी साहित्य संमेलन भरविले होते, शिवाय एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.

तसे प्रकाश हे राजकारणी, शिक्षक आणि सहकार महर्षीही. परंतु आता प्रकाश वेळीप यांनी म्हणे सिनेमात एन्ट्री घेतली आहे, तीही हिंदी सिनेमात. नाही, ते सिनेमाच्या स्क्रिनवर दिसणार नाहीत. प्रकाश सरांनी म्हणे एका हिंदी सिनेमात सहनिर्मात्याची जबाबदारी पार पाडली आहे. सिनेमाची माहिती लवकरच समजेल. एक मात्र खरे की, प्रकाश सर राजकारणातून बाहेर पडले आणि निर्माते बनले.

अब तेरा क्या होगा दादा...

फोंडा पालिका मंडळातील सत्तानाट्य आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. खरे तर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी आठ नगरसेवकांची मोट बांधली होती; पण ऐन मोक्याच्या वेळीच ही मोट फुटली असून नगरसेवक शांताराम कोलवेकर यांना आपल्या बाजूने वळवण्यात रितेश नाईक गट यशस्वी ठरला आहे.

यात मुत्सद्दी राजकारणी तथा कृषी मंत्री रवी नाईक यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे दादा नाईक गट हादरला असेल, हे निश्‍चितच. कारण त्यांना असे काही होईल, हे अपेक्षितच नव्हते. त्यामुळे आता पुढे काय? हा प्रश्‍न दादांच्या सोबत गेलेल्या सातही नगरसेवकांना नक्कीच सतावत असेल. लोक तर म्हणतात, ‘अब आता तेरा क्या होगा दादा....!’

दीड तासाचे लेक्चर

आपण कुठे किती बोलावे व काय बोलावे, याचे तारतम्य बोलणाऱ्याने राखावे लागते. काही प्राध्यापकांना पाऊण तास-दीड तास बोलण्याची सवय असते. कारण कॉलेजमध्ये एक लेक्चर पाऊण तासाचे असते. पण सार्वजनिक कार्यक्रमात जिथे वक्ते जास्त असतील आणि कार्यक्रम जर लांबत असेल तर थोडक्यात बोलणे उचित असते.

एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एक सेवानिवृत्त प्राध्यापक चक्क दीड तास बोलले. तेही चार चार वक्ते बोलणारे असताना. हे महाशय पुस्तकावर सोडून बहिणाबाईंपासून ज्ञानेश्वर, तुकाराम सर्व संत साहित्य, आधुनिक साहित्य आणि स्वत:च्या साहित्यावरही भरभरून बोलले. बरे झाले पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात जेवणाची व्यवस्था होती. अन्यथा लोक वैतागून निघून गेले असते. सरजी, भाषण कसे इंग्रजीतील ‘किस’सारखे म्हणजे ‘किप इट शॉर्ट एन्ड स्वीट’ असावे.

Rohan Khaunte
Petrol-Diesel Prices In Goa: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या आजचे दर

उशिरा आलेली जाग

कळंगुट येथे रशियन पर्यटक तरुणीवर दोघा नेपाळींनी केलेला बलात्कार आणि तेथेच परप्रांतीय दलालांनी स्थानिक तरुणांना बेदम मारहाण केल्यानंतर पोलिस यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. आता प्रामुख्याने बार्देश तालुक्यातील पोलिसांनी ठिकठिकाणी भाड्याने राहणाऱ्या परप्रांतीय रहिवाशांची पडताळणी सुरू केली असून ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत किंवा ज्यांनी ‘सी फॉर्म’ भरलेला नाही, अशा रहिवाशांवर कारवाई सुरू केली आहे.

कोणतीच कागदपत्रे नसलेल्या पाचजणांना पोलिसांनी कोलवाळ येथे ताब्यात घेतले. खरे तर हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. कारण यापूर्वीही काही गुन्हेगारी घटना घडल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच परप्रांतीयांमुळे राज्यात गुन्हेगारीचा टक्का वाढत असल्याचे खुल्या व्यासपीठावरून जाहीर केले होेते. त्यावेळी तरी पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेऊन परप्रांतीयांची पडताळणी सुरू केली असती तर आज कित्येक गुन्हे टाळता आले असते. असो. कारवाई सुरू केली, हेही नसे थोडके.

‘बळी तो कान पिळी’

मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस खात्यांतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील उपनिरीक्षक पदांची भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यानंतर निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने लागला आणि या वादाची परिणती काय होणार, याची खूणगाठ सूज्ञ गोमंतकीयांनी मनाशी बांधलीच होती. नेमके तेच सध्या घडत आहे.

शेवटी ‘बळी तो कान पिळी’ म्हणतात, तेच खरे. पोलिस भरतीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाने केला खरा; पण सरकारने विरोधकांच्या नाकावर टिच्चून ही भरती योग्य आहे, अशा आविर्भावात ती प्रक्रिया नव्याने सुरू केली. यावरून सरकारची एकूणच दिशा आणि ध्येयधोरणे स्पष्ट होतात, असे सूज्ञ गोमंतकीयच आता म्हणत आहेत.

शिवधनुष्य पेलणार का?

सरकारने हल्ली निवडणुका म्हणा किंवा एरवीसुद्धा म्युटेशन वा जमिनीशी संबंधित तक्रारी सहा महिन्यांत निकाली काढणार, अशा घोषणेचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे लोकांना काही काळासाठी समाधान मिळाले. पण आता वस्तुस्थिती समोर आली आहे, ती लाल फितीचा कारभार किती संथ चालतो, हे स्पष्टपणे दर्शवत आहे.

ग्रामीण भागातील काही लोकांनी शेतांमधील पायवाटा रुंदावून शेतजमिनीत अतिक्रमण केल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी (2021) केल्या होत्या. एक वर्ष झाले, तरी या तक्रारींवर ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. कारण एका वर्षात तालुक्यात तीन वेळा मामलेदारांची बदली होते.

मग प्रत्येक मामलेदार आपल्याला या केसचा अभ्यास करण्यासाठी महिना-दीड महिना घेतो. पुन्हा ‘तारीख पे तारीख’ सिलसिला सुरू होतो. त्यामुळे म्युटेशन प्रकरणांचे हे शिवधनुष्य प्रशासनाला पेलणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com