

Goa travel rules: या सुट्टीत गोव्याला स्वतःची गाडी घेऊन सहलीला जाण्याचा विचार करताय का? हो तर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठा बदल झाला आहे. पर्यटक म्हणून गोव्याला जाताना हे बदल आणि नियम तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. यामुळे तुमचा प्रवास सोयीस्कर होईल. गोव्यातील एक इन्फ्लुएन्सर भुक्कड गर्ल हिने संबंधित एक पोस्ट शेअर केली होती. हे बदल कोणते आणि पर्यटक म्हणून तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे चला जाणून घेऊया.
गोव्याने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित 'GoVA' (GoVA Vehicle Verification System) नावाची एक अत्याधुनिक प्रणाली सुरू केली असून या 'स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे राज्यातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीला एक नवी दिशा मिळाली आहे. ही प्रणाली वाहनांचे आवश्यक दस्तऐवज (RC, विमा आणि PUC) ऑटोमॅटिक पद्धतीने तपासते. या बदलामुळे, गोव्याची ट्रिप सुरक्षित आणि अधिक जबाबदार बनणार आहे, पण त्याच वेळी कागदपत्रे अपडेट नसतील तर मोठा दंड बसण्याची शक्यता असून हे पर्यटकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरू झालाय. ऑक्टोबर ते मार्च या काळात गोव्यात मोठ्या संख्येने चार्टर्ड विमाने आणि देश-विदेशातील पर्यटक दाखल होतात. हा काळ गोव्यातील समुद्रकिनारे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सणांमुळे अधिक महत्त्वाचा असतो.
नेमक्या याच वेळी 'GoVA' प्रणाली सुरू झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. उदाहरणार्थ, PUC (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) नसलेल्या वाहनांना १०,००० पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
तसेच, जर इन्शुरन्स (विमा) संपलेला आढळला तर पहिल्यांदा २,००० आणि पुन्हा आढळल्यास ४,००० दंड लागू होईल. याव्यतिरिक्त, कागदपत्रे मिसमॅच झाल्यास गाडी जागेवर थांबवून सखोल चौकशी केली जाईल. सध्या मोले चेकपोस्टवर ही प्रणाली लागू झाली असून, लवकरच ती पत्रादेवी, केरी आणि पोळे चेकपोस्टवरही सक्रिय होणार आहे.
गोव्यातील पर्यटन हे येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 'टुरिझम' म्हणजेच पर्यटनाला अधिक सुरक्षित, व्यवस्थित आणि पर्यावरणास अनुकूल बनवणे, हा 'GoVA' प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. गोव्याची नैसर्गिक सुंदरताआणि शांत वातावरण टिकवून ठेवण्यासाठी, विशेषत: वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कागदपत्रांचे उल्लंघन टाळण्यासाठी, हे पाऊल उचलणे आवश्यक होते.
पर्यटनासाठी गोवा हे आजही भारतीयांसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. त्यामुळे, गोव्यातील सुट्टीचा आनंद घेण्यासाठी प्रवाशांनी आता अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे अपडेटेड असतील, तरच गोव्यात तुमचा प्रवास निर्धोक आणि सुखकर होईल.
गोव्यातील तुमचा प्रवास 'स्मार्ट शॉक' देणारा ठरू नये म्हणून PUC, इन्शुरन्स आणि RC हे तीनही महत्त्वाचे दस्तऐवज तपासणीपूर्वी तयार ठेवा. गोव्याची संस्कृती, शांत समुद्रकिनारे आणि सुंदर नैसर्गिक सौंदर्य अनुभवा, पण सोबतच तेथील नियमांचा आदर करा. नियमांचे पालन करून गोव्यात दाखल व्हा आणि या 'फेस्टिव्ह सिझन'चा मनमुराद आनंद घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.