
पणजी: पर्यटन खात्याने दक्षिण गोव्यातील जलक्रीडा पर्यटनास चालना देण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्यासाठी कुंभारजुवा कालव्यातील एका नव्या भागाला अधिकृतपणे पर्यटनस्थळ म्हणून अधिसूचित केले आहे. अधिसूचनेत कुडतरी फेरी ते बाणस्तारी पुलापर्यंतचा भाग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केला असून येथे जलक्रीडा उपक्रमांवर भर देण्यात येईल.
या अधिसूचनेनुसार कुंभारजुवा कालव्यातील जलमार्ग आता अधिकृत पर्यटन क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. पर्यटन संचालक केदार नाईक यांनी राज्यपालांच्या आदेशाने ही अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे जलक्रीडा सेवा अधिक नियोजित, सुरक्षित आणि व्यावसायिक पद्धतीने चालवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन दर्शनीय क्षेत्र निश्चित करून आणि सुरक्षाविषयक अटी स्पष्ट केल्यामुळे गोव्यातील जलक्रीडा पर्यटन अधिक सुरक्षित, आकर्षक व पर्यटकांना विश्वास देणारे ठरेल, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बचाव साहित्य अनिवार्य
नदीमध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी फेरी बोटी चालवणारे जलक्रीडा ऑपरेटर आणि नदी परिवहन विभाग यांच्यात योग्य समन्वय आवश्यक आहे. सर्व जलक्रीडा बोटींवर प्राथमिक उपचार साहित्य, जीवनरक्षक जॅकेट्स, लाईफ बॉयज इत्यादी बचाव साहित्य अनिवार्यपणे उपलब्ध असावे अशी अटदेखील पर्यटन खात्याने घातली आहे.
जलक्रीडा सेवांना मान्यता
या क्षेत्रात ''क्रोकोडाईल डंडी'' नावाची विशेष जलक्रीडा सेवा मान्य करण्यात आली आहे. या संपूर्ण जलमार्गात जलक्रीडा सेवांना आता अधिकृत मान्यता देखील देण्यात असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
अन्य विभागांचे ना हरकत आवश्यक
प्रत्येक ऑपरेटरने जलक्रीडा सेवा सुरू करण्याआधी मत्स्य व्यवसाय संचालनालय आणि संबंधित इतर विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच बोटीचे इंजिन बंद पडणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णत: कार्यक्षम आपत्कालीन योजना तयार असणे आवश्यक असून याची जबाबदारी ऑपरेटरवर असेल असेही पर्यटन खात्याने नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.