बारावीनंतर केवळ 'कॉलेज' ही संकल्पना पूर्वीपासून चालत आली आहे. परंतु आता प्रत्येक विद्यार्थ्याला आवडीनुसार कौशल्य विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने बारावीनंतर कौशल्य विकास शिक्षणाची संधी प्रत्येक आयटीआयद्वारे उपलब्ध केली आहे.
15 जुलैपासून आयटीआयमध्ये 'हॉस्पिटॅलिटी' आणि 'हाऊसकिपिंग' हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
साखळी मतदारसंघातील वेळगे येथील श्रीमती हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आठवी, नववी व दहावीचे राज्यभरातील सुमारे ६० हजार विद्यार्थी या व्हर्चुअल मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हे युग नावीन्यपूर्ण व संशोधनात्मक शिक्षण ग्रहण करून आपला वेगळा ठसा उमटवण्याचे असून या युगात कोणीही विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी मुलांनी आजपासूनच स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला लागावे. उज्ज्वल भविष्यासाठी आजच ध्येय ठरवून शिक्षण अभ्यासक्रम स्वीकारावा
शैक्षणिक प्रवासाचे नियोजन करा !
दहावीनंतर काय? या संभ्रमात न पडता आतापासूनच विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक प्रवासाचे नियोजन करा, या प्रक्रियेत शिक्षकांची मदत घ्या, असा मंत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यभरातील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षकांनी मार्गदर्शक बनावे
माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक स्तरावर पोहोचल्यावर कोणता अभ्यासक्रम निवडावा याचे पुरेसे ज्ञान किंवा मार्गदर्शन नसल्याने अनेक विद्यार्थी संभ्रमात पडतात. अशावेळी त्यांना पालकांकडूनही योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करून त्यांचे भविष्यातील शिक्षण मार्गी लावण्याची जबाबदारी स्वीकारावी. ही जबाबदारी वैयक्तिक पातळीवर प्रत्येक शिक्षकाने घेतल्यास कोणीही विद्यार्थी ध्येयापासून भरकटू शकत नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.