
पणजी: पत्रादेवी, मोपा विमानतळ ते बंगळुरू असा नवा मार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी झाली आहे. त्यासाठी चार पर्याय विचारात घेतले होते, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी झुआरी पुलाच्या टेहळणी मनोऱ्याचे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमात या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्याविषयी आज सरकारी पातळीवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उघडपणे कोणीही माहिती देण्यास तयार नव्हता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच याविषयी अधिक माहिती देऊ शकतील, असे ठराविक साच्याचे उत्तर प्रशासकीय पातळीवर मिळत होते.
गोव्याच्या वाहतूक नकाशात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्याच्या उत्तर सीमेवरील प्रवेशद्वार असलेल्या पत्रादेवीपासून थेट बंगळुरूपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी विविध पर्यायी मार्गांचा विचार सुरू असून, पारंपरिक मध्य गोव्यामधून जाणाऱ्या मार्गाला पर्याय शोधण्याच्या हालचाली गती घेत आहेत.
सध्याचा विद्यमान महामार्ग मोले, अनमोड, रामनगर मार्गे बंगळुरूला जातो. मात्र, हा मार्ग घनदाट जंगलातून, मोले राष्ट्रीय उद्यानाच्या संवेदनशील क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणीय मर्यादा आणि प्रकल्पविरोधाचा मोठा धोका आहे. त्यामुळे गोवा सरकार आणि संबंधित रस्ते विकास यंत्रणांनी काही नवे पर्याय समोर आणले आहेत.
तिलारी घाटाची मर्यादा : अत्यंत अरूंद, तीव्र वळणांचा आणि ढासळत्या भागातला हा घाट महामार्गासाठी धोकादायक आहे. त्याचा विकास करण्यासाठी प्रचंड निधी, खोदकाम व अभियांत्रिकी कौशल्य लागेल.
नवीन मार्ग मान्यता प्रक्रिया : हा मार्ग विद्यमान राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या प्रस्तावात नाही. त्यामुळे नव्याने प्रस्ताव, भू-सर्वेक्षण, पर्यावरणीय परवाने आणि वित्तीय मान्यता घेण्याची आवश्यकता.
दक्षिण गोव्याचा वगळलेला सहभाग : मडगाव, फोंडा, वास्को हे मोठे शहरी भाग या मार्गातून वगळले जातील. त्यामुळे हा पूरक मार्ग ठरेल.
राजकीय व सामाजिक सहमतीचे आव्हान : नव्या रस्त्यासाठी स्थानिक लोकांचा प्रतिसाद, वन खात्याची परवानगी आणि शेजारच्या राज्यांचे सहकार्य हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत.
सर्व पर्यायांमध्ये पत्रादेवी - मोपा - परमे - तिलारी घाट - चंदगड - बेळगाव - धारवाड - हुबळी - बंगळुरू या मार्गाचा विचार प्रशासकीय पातळीवर करण्यात आला आहे. हाच मार्ग अंतिम होईल, असे गृहित धरून आरेखन केल्याची माहिती आहे. या मार्गामुळे गोव्याच्या उत्तर सीमेपासून थेट कर्नाटकमार्गे बंगळुरूशी जोडणी साधली जाईल. विशेष म्हणजे, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावर येत असल्याने त्याच्या प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेला मोठा आधार मिळू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे.
गोव्याच्या वाहतूक आराखड्यातून पर्यावरणीय दृष्टिकोन आणि विकासाचा समतोल राखत नवे मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. पत्रादेवी - मोपा - चंदगड - बंगळुरू हा मार्ग एक दूरदृष्टीपूर्ण पर्याय असू शकतो. हा मार्ग साकारला, तर गोव्याच्या उत्तर सीमेपासून नवा औद्योगिक व व्यापारवृद्धीचा झोन विकसित होऊ शकतो, तर मध्य व दक्षिण गोव्यावरील पर्यावरणीय ताण कमी होईल.
पत्रादेवी - साखळी - फोंडा - मडगाव - कुंकळ्ळी - कारवार - बंगळुरू
हा मार्ग गोव्याच्या मध्य भागातून जाऊन दक्षिण भागातील मुख्य ठिकाणांशी (मडगाव, कुंकळ्ळी) संपर्क ठेवणार होता. दक्षिण गोव्यातील पर्यटन व व्यापारिक वाहतूक सुलभ करण्याचा यामागचा उद्देश होता. मडगावसह दक्षिण गोव्याला थेट महामार्ग संपर्क मिळणार होता.
पत्रादेवी - साखळी - फोंडा - काणकोण - कारवार - बंगळुरू
फोंड्याहून सावर्डे, काणकोणमार्गे हा मार्ग नेण्याचा विचार होता. हा पर्याय अधिक दक्षिणेकडून जाणार होता आणि काणकोणसारख्या पर्यटन स्थळांना समाविष्ट करणार होता. दक्षिण कोकणशी थेट जोडणी, पर्यटनवृद्धीची संधी म्हणून या पर्यायाकडे पाहिले जात होते.
पत्रादेवी - साखळी - सासष्टी - चांदर - केपे - कुंकळ्ळी - कारवार - बंगळुरू
ग्रामीण व अल्पविकसित पट्ट्यांतून जाणारा हा मार्ग असणार होता. मागास भागांचा विकास, नव्या औद्योगिक विभागासाठी संधी म्हणून याकडे पाहिले जात होते. मात्र, विद्यमान रस्ते कमकुवत, प्रचंड गुंतवणूक आवश्यक अशी आव्हाने होती.
पत्रादेवी - धारबांदोडा - वाळपई - मोले - अनमोड - रामनगर - यल्लापूर - बंगळुरू
हा सध्या वापरात असलेला मार्ग आहे. केवळ रस्ता रुंदीकरणातून काम चालणार होते. प्राथमिक यंत्रणा अस्तित्वात आहे. मात्र, पर्यावरणीय आंदोलने, वनक्षेत्रातील निर्बंध याचा विचार या पर्यायाच्या संदर्भाने करण्यात आला.
मोपा विमानतळाचा लाभ : मोपा विमानतळ सध्या वाहतुकीच्या मर्यादांमुळे अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही. महामार्ग जोडणीमुळे लॉजिस्टिक पार्क्स, गोदामे आणि व्यापार केंद्रे उभारण्यास चालना मिळेल.
पर्यावरणीय दबावापासून दूर : हा मार्ग मोलेसारख्या संवेदनशील जंगल भागापासून दूर असल्याने पर्यावरणपूरक नियोजनासाठी उपयुक्त ठरेल.
उत्तर गोव्याचा विकास : पर्यटन किंवा औद्योगिक दृष्टीने तुलनेने दुर्लक्षित असलेल्या उत्तर गोव्याचा सर्वांगीण विकास शक्य.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागांचा समावेश : चंदगड, बेळगाव भागांची गोव्यासोबत व्यापारवृद्धी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.