

पणजी: गणेश चतुर्थीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या शनिवारपासून (५ सप्टेंबर) गोमंतकीय जनतेला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे त्यासाठी उत्पन्न मर्यादेची गरज नसल्याने राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पर्वरीतील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठीच्या ‘गोवा उज्ज्वला’ योजनेची घोषणा केली. यावेळी मंत्री रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, नागरीपुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर, संचालक जयंत तारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
येत्या शनिवारी सर्वच पंचायतींत योजनेचे लोकार्पण केले जाईल आणि प्रत्येक पंचायतीत योजनेचे अर्ज ठेवले जातील. नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. एलपीजी आणि पीएनजी जोडण्या असलेल्या सर्व घरगुती ग्राहकांना योजनेचा लाभ मिळेल. प्रत्येक कुटुंबात केवळ एकाच जोडणीसाठी योजनेचा लाभ मिळेल.
‘गृहआधार’ आणि ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि खुला अशा दोन गटांद्वारे योजनेची अंमलबजावणी केली जाईल. दोन्ही गटांसाठी वेगवेगळे अर्ज सादर करावे लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कोटीतीर्थ कॉरिडोरचा आज शुभारंभ
पुरातत्व खात्यामार्फत दिवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या कोटीतीर्थ कॉरिडोर प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला आपल्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई उपस्थित असतील. दिवाडीत सापडलेल्या जुन्या अवशेषांच्या पूजनासाठी मांडवी आरतीही केली जाणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने वाहतूक व्यवस्थाही केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाच वर्षांसाठी असतात आश्वासने
गोमंतकीय जनतेला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा भाजपने २०२२च्या विधानसभा निवडणुकीवेळी जाहिरनाम्यात केली होती. ही आश्वासने वचने पाच वर्षांसाठी असतात. अजून सरकारचा सात महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्याआधीच आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केले, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
योजनेसाठीचे गट व आवश्यक कागदपत्रे
१. गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला : आधारकार्ड, बँक पासबूक, गॅसजोडणी पासबुकाच्या प्रती
२. खुला गट : आधारकार्ड, गॅसजोडणी पासबूक, केवायसी लिंक असलेले पासबूक, एपिक कार्ड (जुनेही चालेल)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.