
मडगाव: एकेकाळी गोव्यात ड्रग्स म्हणजे गांजा आणि अफीम या दोन पदार्थांपुरते मर्यादित होते. मात्र, आता गोवा हा सिंथेटिक ड्रग्स कॉकटेलची प्रयोगशाळा झाली असून मागच्या सात महिन्यांत असे ५२ संशयास्पद मृत्यू पुढे आले आहेत. जे या ना त्या कारणाने ड्रग्सशी संबंधित आहेत अशी बातमी खास सूत्राकडून मिळाली आहे.
हे सर्व मृत्यू उत्तर गोव्यातील असून त्यातील बरेच मृत्यू हणजुणे, मांद्रे, कळंगुट, पेडणे आणि साळगाव या किनारपट्टी भागाशी जोडलेले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गाेव्यात आता सिंथेटिक ड्रग्स विद्यार्थ्यांपर्यंतही पोचले आहेत हे बिट्स पिलानीमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूतून समोर आले होते.
गोव्यात मागच्या सात महिन्यांत झालेल्या या ५२ मृत्यूत एकूण १३ प्रकारच्या ड्रग्सचा समावेश असल्याचे दिसून आले असून यातील सर्वाधिक मृत्यू ॲम्फेटामाईन या ड्रग्समुळे झाल्याची माहिती मिळाली आहे.
बिट्स पिलानीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणातही या ॲम्फेटामाईनचा संबंध होता. एकूण १८ मृत्यू या ड्रग्सशी निगडीत असून त्या पाठोपाठ १२ मृत्यू हे गांजा मिश्रित ड्रग्समुळे झालेले आहेत. एसीई, ट्रॅमेडॉल, मेटाफेटामाईन, एमडीएमए, कोकेन अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स या मृत्यूमागे असल्याची माहिती पुढे आली आहे.
उत्तर गोव्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गोव्यात गांजा आणि अफीम हेच ड्रग्स प्रचलित होते. विशेषत: विदेशातून आलेले पर्यटक या ड्रग्सच्या आहारी गेलेले दिसत होते. मात्र, आता गोव्यातील ड्रग्स विश्वाचे चित्रच बदलले असून किनारपट्टी भागात सिंथेटिक ड्रग्स सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागच्या सात महिन्यांत जे ५२ संशयास्पद मृत्यू झाले आहेत, त्यातील सगळ्याच मृत्यूत ड्रग्सचा थेट संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या मृत्यूत ड्रग्सचा संबंध असावा अशी शंका निर्माण करण्यासारखी ही प्रकरणे होती.
या ५२ मृत्यूंपैकी हणजुणे, मांद्रे, डिचोली या भागात प्रत्येकी सात, आगशी, जुने गोवे, कळंगुट या पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी पाच, पणजीत चार, पर्वरीत तीन, पेडणे, कोलवाळ, वाळपई व साळगाव येथे प्रत्येकी दोन, तर म्हापसा व मोपा येथे प्रत्येकी एका मृत्यूची नाेंद झाली आहे. यातील कित्येक मृतांच्या व्हिसेराचे जतन पुढील चौकशीसाठी करून ठेवण्यात आले आहे.
गोव्यात ड्रग्स पेडलर्स आणि ड्रग्स घेणारे यांची संख्या वाढत असून पोलिस आकडेवारीनुसार मागच्या पाच वर्षांत एकूण ७७५ जणांना अटक केली आहे. मागच्यावर्षी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे १९० जणांना अटक केली होती, तर यंदा पहिल्या पाच महिन्यांत ४५ जणांना अटक केली आहे. गोव्यात दरवर्षी २०० ते २५० किलो ड्रग्स पकडले जात असून गाेव्यात आणले जाणारे ड्रग्स नंतर तेलंगणा या राज्यातही जात असल्याची बाबही पुढे आली आहे. यावर्षी वास्को येथे गोवा पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सर्वांत मोठ्या ड्रग रॅकेटमध्ये थायलंडचा संबंध असल्याचेही उघडकीस आले होते.
गोव्यात ड्रग्सला थारा मिळू नये यासाठी गोवा पोलिसांकडून सर्व प्रयत्न चालू आहेत. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी ड्रग्सचे बळी पडू नयेत यासाठी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन पोलिस जागृतीचे कार्यक्रम आयोजित करत आहे. ज्या ठिकाणी हॉस्टेल्समध्ये विद्यार्थी थांबतात तिथे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. बिट्समध्येही सध्या पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
आलोक कुमार, पोलिस महासंचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.