Suleman Khan Case:...अन्‌ अलगद अमित सिद्दीकीच्‍या जाळ्‍यात अडकला! आईवडिलांना बसला मोठा मानसिक धक्का

Suleman Khan Criminal Network: आयआरबीचा बडतर्फ शिपाई अमित नाईक याचा स्वभाव शांत असल्याने तो अट्टल गुन्हेगार सुलेमान खान याच्या जाळ्यात अडकला असावा, असे त्याला ओळखणाऱ्या लोकांना वाटते.
Suleman Khan Case:...अन्‌ अलगद अमित सिद्दीकीच्‍या जाळ्‍यात अडकला! आईवडिलांना बसला मोठा मानसिक धक्का
Published on
Updated on

वास्को: आयआरबीचा बडतर्फ शिपाई अमित नाईक याचा स्वभाव शांत असल्याने तो अट्टल गुन्हेगार सुलेमान खान याच्या जाळ्यात अडकला असावा, असे त्याला ओळखणाऱ्या लोकांना वाटते. परंतु काही लोक त्याच्याबद्दल कडवट प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

सासमोळे-बायणा येथील हाजीराबी इमारतीमध्ये अमित नाईक याचे कुटुंब बरीच वर्षे भाड्याने राहिले. अमितचे वडील अशोक हे ओल्ड पॉवर हाऊसच्या जागेत एका लहान गाड्यामध्ये मिक्‍सर, पंखे, इस्त्री वगैरे दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करत होते. त्यानंतर पॉवर हाऊस येथे मुरगाव पालिका कमर्शिअल प्रकल्प उभारत असल्याने तेथील गाडेधारकांना बायणातील एमपीए व रेल्वेच्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस जागा देण्यात आली आहे. सध्या त्याचे वडील एमपीएच्या कुंपणालगत असलेल्या जागेतील गाड्यामध्ये स्वतःचा व्यवसाय करतात.

अमितची आई प्रेमा ही टेलरिंगचे काम करते. तिचा सामाजिक, राजकीय कार्यात वावर आहे. त्यामुळे त्या भागात तिला बरेचजण ओळखतात. अमित याचा भाऊ अमेरिकेत (America) नोकरीला होता. तथापि, आजारपणात त्याचे निधन झाले. तर बहीण बेंगलोरमध्य ‘आयटी’ कंपनीत कामाला आहे. एकंदर घरची परिस्थिती चांगली आहे. अमित याचे शालेय शिक्षण बायणातील एका विद्यालयात झाले. त्‍याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगाही आहे.

आईवडिलांना बसलाय मोठा मानसिक धक्का

कोविडनंतर २०२० मध्‍ये अमित नाईकचे कुटुंब जयरामनगर-दाबोळी येथे राहण्यास आले. त्याचा भाऊ विदेशात नोकरीला लागल्यावर त्यांनी रो बंगला विकत घेतला. त्याच बंगल्यात आता ते सर्वजण राहतात. त्याचे आईवडील अद्याप आपापला व्यवसाय करत आहेत. तथापि, ज्या दिवशी अमितचे हे प्रकरण उघडकीस आले, तेव्‍हापासून वडिलांचा गाडा बंदच आहे. ती बातमी ऐकल्यावर त्याच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार करून नंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. त्याच्या आईचीही मानसिक स्थिती बिघडली आहे.

अमितला बनविले बळीचा बकरा : तारा केरकर

१ सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी मात्र अमित नाईक याला बळीचा बकरा बनविण्‍यात आल्याचा दावा केला आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, अमितच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याला फसविण्यात आले आहे.

२ तीन महिन्यांपूर्वी एका प्रकरणात अमितचे कुटुंब माझ्या संपर्कात आले आहे. त्यामुळे त्याच्या आईवडिलांसह अमितला मी चांगले ओळखते.

३ रस्त्यावरील भटक्या कुत्र्यामांजरांना खाऊ घालणे, कधीकधी त्‍या लहान पिल्लांना पोसण्यासाठी घरी आणून त्यांची जोपासना करणे, सापांना पकडून त्यांना योग्य ठिकाणी सोडणे आदी कामे अमित करत असे. प्राणिमात्रांवर दया करणाऱ्या अमितला सहजपणे फसविण्यात आले आहे.

४ अमितच्या आईवडिलांच्या तब्‍येतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांची मी समजूत काढली असल्याचे तारा केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com