

पेडणे: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोवा स्ट्रीट रेस’ आणि ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल’ वरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
या प्रस्तावित शर्यतीमुळे विमानतळ सुरक्षा नियमांचे आणि सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिक ज्ञानेश्वर वरक यांनी केला असून या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, नागरी विमान प्रधिकरण आणि मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.
वरक यांनी आपल्या तक्रारीत ८ नोव्हेंबर २०१६ रोजी गोवा सरकार आणि ‘जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ यांच्यात झालेल्या सवलत कराराचा उल्लेख केला आहे. या करारातील कलम ५.१४ नुसार, कंपनीला केवळ विमानतळ प्रकल्प राबवणे आणि व्यवस्थापन करणे याच ‘एकमेव उद्देशासाठी’ जमीन देण्यात आली आहे. आता त्याचा वापर अशा स्पर्धांसाठी होणे योग्य नाही.
विमानतळ हा अतिसंवेदनशील विभाग असतो. रेसिंगच्या नावाखाली रस्ते बंद करणे, अतिवेगाने वाहने चालवणे आणि इंधन साठवणूक केंद्रांजवळ असे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे आगीसारख्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणे होय, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. करारातील कलम १७.१.१(अ) नुसार विमानतळ परिसरात प्रवाशांची ये-जा विनासायास होणे बंधनकारक आहे, परंतु रेसिंगमुळे यामध्ये अडथळे येतील, असे वरक यांनी पत्रात नमूद केले आहे.
मोपा विमानतळासाठी स्थानिकांनी जमिनी सार्वजनिक हितासाठी आणि विमान वाहतुकीसाठी दिल्या होत्या. आता त्याच जमिनीचा वापर हाय-रिस्क व्यावसायिक मनोरंजनासाठी करणे, हा जनतेच्या विश्वासघात आहे.
- ज्ञानेश्वर वरक, स्थानिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.