Goa Stray Cattle Issue : गोव्यात जवळपास प्रत्येक भागात रस्त्यावर असलेल्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना आणि रहदारीसाठी बाधा ठरत आहे. ही समस्या लक्षात घेत, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शनिवारी नागरी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या गुरांची वैयक्तिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. (Goa Stray Cattle Issue )
पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाशी संबंधित योजनांबाबत संवाद साधताना, हळर्णकर म्हणाले, 'सरकारने स्थानिक नागरी संस्थांना रस्त्यावरून भटकी गुरे पकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गोठ्यात ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. तथापि, सर्व पंचायती आणि नगरपालिका या योजनेचा सक्रियपणे वापर करत नाहीत. यामुळे याचा नाहक त्रास रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना आणि वाहनचालकांना होत आहे.'
ते पुढे म्हणाले, मी पंचायतींना आवाहन करतो, विशेषत: ज्या ठिकाणी भटक्या गुरांची संख्या जास्त आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा किंवा भटक्या जनावरांच्या बचाव आणि व्यवस्थापनात गुंतलेल्या पशु स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करावा.
रस्त्यांवरील भटक्या गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गोवा भटकी जनावरे व्यवस्थापन योजना, 2013 जाहीर करण्यात आली. योजनेनुसार, भटक्या गुरांना पकडण्यासाठी एजन्सी नेमून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.