Goa Statehood Day 2024: गोवा घटकराज्य दिन विशेष! समृद्ध वारसा, इतिहास आणि संस्कृती

Goa Statehood Day 2024: गोव्याचे क्षेत्रफळ ३७०२ चौरस किलोमीटर एवढे असून, गोव्यात कोकणी व मराठी या प्रमुख भाषा आहेत.
Goa Statehood Day 2024
Goa Statehood Day 2024Dainik Gomantak

Goa Statehood Day 2024

आजच्‍या महत्त्वाच्या प्रसंगी, आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया. त्यांच्या उत्कृष्टतेचा, नाविन्यपूर्णतेचा आणि करुणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया.

गोव्याने गेल्या दशकांमध्ये विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा, विकास, पायाभूत सुविधा इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गोवा ही शांतताप्रिय आणि समृद्ध भूमी आहे. येथील परंपरा जपल्या पाहिजेत. येथील नागरिकांनी वारसा जपला आहे.

जगातील विविध भागांतून लोक येथे निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वैविध्‍य पाहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी येतात. आपण हे सर्व मूळ गुण जपले पाहिजेत आणि आपल्या पर्यटकांचा मुक्काम आनंददायी आणि संस्मरणीय बनविला पाहिजे.

राज्यात नैतिकतेच्या धर्तीवर पर्यटनाची प्रगती होईल, याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. गोव्याने जागतिक दर्जाचा ‘मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ साकारून पायाभूत सुविधांचा विकास साधला आहे, जो सौरऊर्जा प्रकल्प, पावसाचे पाण्याचा जतन करण्याचा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुविधांसह टिकाऊ पायाभूत सुविधांच्या संकल्पनेवर आधारित आहे.

स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचा देशातील इतर राज्यांनी आदर्श घेतला आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धारगळ, पेडणे येथील आयुष रुग्णालय महत्त्‍वपूर्ण ठरत आहे.

दरम्‍यान, गोव्यात अवाढव्य आर्थिक घडामोडी, गुंतवणुकीच्या क्षेत्रात बिगर गोमंतकीय अग्रेसर असलेले दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत गोवेकर गोव्यात कमी दिसत असल्याचे कारण म्हणजे गोव्यात रोजगार आणि प्रशिक्षण हे गोवेकरांच्या प्रतिकूल आहेत.

गोवेकरांना गरजेचे आणि अनुकूल प्रशिक्षण लाभल्यास ते फायदेशीर ठरेल. आज गोव्याचे गोंयकारपण टिकवून ठेवण्याची गरज आहे. गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्याचे क्षेत्रफळ ३७०२ चौरस किलोमीटर एवढे असून, गोव्यात कोकणी व मराठी या प्रमुख भाषा आहेत.

येथे प्रामुख्याने तांदूळ, काजू, सुपारी व कडधान्यांचे पीक घेतले जाते. गोव्यात मँगनीज, लोह, बॉक्साइट ही खनिजे आढळतात. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून, राज्यातील सर्वात मोठे शहर वास्को आहे. तसेच पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगाव व इतर महत्त्वाची शहरे आहेत.

गोव्यात विशेष करून गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नवरात्र उत्सव त्याचबरोबरच नाताळ हा सण साजरा होतो. गोवा हे सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे राज्य आहे. समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी व परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तसेच गोव्यात प्राचीन मंदिरे व चर्चही प्रसिद्ध आहेत.

Goa Statehood Day 2024
Goa Accidents: वेगाची नशा! कुर्टी, वास्को, सांगे, कुळेत अपघाताच्या घटना; थोडक्यात वाचले जीव

दरम्‍यान, ३० मे १९८७ या दिवसाला वेगळे महत्त्व आहे. कारण त्या दिवशी तत्‍कालीन पंतप्रधान राजीव गांधी गोवेकरांचे हे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी स्‍वत: गोव्‍यात आले होते. त्‍यांच्‍याच उपस्‍थितीत गोव्‍याला त्या दिवशी घटक राज्‍याचा दर्जा देण्‍यात आला.

मात्र, हे सारे सहजासहजी झाले नव्‍हते. हा दर्जा मिळविण्‍यासाठी तब्‍बल २१ वर्षे गोवेकरांना खटपटी कराव्‍या लागल्‍या. वेळोवेळी केंद्राचे दरवाजे खटखटावे लागले. एवढेच नव्‍हे तर यासाठी ५७५ दिवसांचे उग्र असे आंदोलनही करावे लागले. गोव्‍याला स्‍वतंत्र राज्‍याचा दर्जा देण्‍याचे आश्र्वासन जवाहरलाल नेहरू यांनीच दिले होते.

पण त्‍यांचे मत होते, की पहिल्‍या दहा वर्षांसाठी गोवा संघप्रदेश असावा. फालेरो यांनी १९७१ विधानसभेत आमदार असताना घटक राज्‍याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार गोविंद पानकर यांनीही असा ठराव मांडला.

मुख्‍य म्‍हणजे, तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शशिकला काकोडकर यांचाही या मागणीला पाठिंबा होता. त्‍यानंतर फालेरो लोकसभेवर निवडून गेले. त्‍यावेळी जनता पार्टीचे सरकार होते. ४ एप्रिल १९७७ या दिवशी लोकसभेत त्‍यांनी हा मुद्दा चर्चेत आणला.

गोव्‍यापेक्षा कमी लोकसंख्‍या असलेल्‍या ईशान्‍य भारतातील प्रदेशांना जर राज्‍याचा दर्जा मिळतो, तर गोव्‍याला तो का मिळत नाही? हा महत्त्वाचा मुद्दा त्‍यांनी लोकसभेत उपस्‍थित केला. तत्‍कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना लहान आकाराची राज्‍ये ही संकल्‍पना मान्‍य नव्‍हती. त्‍यामुळेच ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.

नंतर त्‍यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर हा मुद्दा आणला. काँग्रेस अध्‍यक्ष इंदिरा गांधी यांच्‍यासमोर त्‍यांनी हा मुद्दा चर्चेत आणला. त्‍यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस राजीव गांधी होते. त्‍यांनी हा मुद्दा पूर्णपणे समजून घेतला.

ते स्‍वत: ज्‍यावेळी पंतप्रधान झाले, त्‍यावेळी त्‍यांनी गोव्‍याची ही मागणी पूर्ण केली. आज आपण सारे घटकराज्‍य म्‍हणून फळे चाखत आहोत.

भौतिक प्रगतीमध्‍ये अव्‍वल

मुक्‍त गोव्‍याचा विकासात्‍मक पाया पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी रचला. त्‍यावर माजी दिवंगत मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कळस उभारला. गोव्‍याचा चौफेर विकास होत आहे. गोव्‍यात अनेक सामाजिक योजना आहेत. त्‍यामुळे सामान्‍य घटकांना दिलासा मिळत आहे. घटकराज्‍य दर्जा मिळाल्‍याने गोव्‍याची वाटचाल सुकर झाली.

येथील आरोग्‍य व्‍यवस्‍था वाखाणण्‍याजोगी आहे. स्‍थानिकांना दीनदयाळ योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतात. गोवा मेडिकल कॉलेज अनेकांसाठी देवदूत ठरले आहे. कॅन्‍सरवर उपचारांसाठी सुसज्‍ज इस्‍पितळ उभे राहात आहे. तरुणांच्‍या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. मुख्‍यमंत्र्यांनी सुरू केलेली ‘स्‍टायपेंड’ योजना महत्त्‍वाकांक्षी आहे. त्‍यामधून श्रमशक्‍तीला चालना मिळणार आहे.

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत हे दूरदृष्‍टी बाळगून विविध योजना राबवत आहेत. स्‍वयंपूर्ण गोवा योजनेला प्रचंड यश मिळाले आहे. आपले राज्‍य स्वावलंबी व्‍हावे, यासाठी ते राबत आहेत. शिक्षण क्षेत्रात गोव्‍याने गरुडझेप घेतली आहे. साक्षरतेच्‍या बाबतीत गोवा आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रात यश दिसू लागले आहे. भविष्‍यात अशीच प्रगती होत राहो.

असे बनले गोवा घटकराज्‍य

1) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाला. पण, गोवा मात्र तेव्हादेखील पोर्तुगीज अंमलाखालीच होता. पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी गोवा मुक्ती आंदोलन झाले. संघर्षानंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांपासून स्वतंत्र झाला.

2) स्वातंत्र्यानंतर सुरवातीची अनेक वर्षे गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता. गोवा हा प्रदेश सुरवातीची १० वर्षे केंद्रशासित ठेवावा आणि त्यानंतर तो स्वतंत्र ठेवावा की महाराष्ट्र किंवा कर्नाटकात त्याचे विलीनीकरण करावे, याबाबत निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यावरून खूप चर्चा आणि संघर्षही झाला.

3) गोवा आणि दमण व दीव मिळून एकच केंद्रशासित प्रदेश होता. विकासाच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरत होते. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रावर अवलंबून राहावे लागत होते. त्यातून अन्यायाची भावना गोमंतकीयांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच घटकराज्याची मागणी पुढे आली. गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.

१६ जानेवारी १९६७ रोजी जनमत कौल घेण्यात आला. या जनमत कौलात नागरिकांना गोव्याचे इतर राज्यांमध्ये विलीनीकरण करण्याविरोधात मतदान केले. गोवा, दमण व दीव स्वतंत्र संघ प्रदेश म्हणून ठेवण्याचा निर्णय झाला. हा अशा पद्धतीचा भारतातला पहिला आणि एकमेव जनमत कौल होता.

4) ऑक्टोबर १९७६ मध्ये पुरुषोत्तम काकोडकर यांनी लोकसभेत गोव्याला घटक राज्याच्या दर्जा देण्याबाबतचे खासगी विधेयक मांडले. ४ एप्रिल १९७७ रोजी खासदार एदुआर्द फालेरो यांनी ईशान्येकडील मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, अरूणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे गोवाही राज्य व्हावे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

5) राजीव गांधी पंतप्रधान असताना गोव्याला पूर्ण राज्य बनविणारे विधेयक मंजूर करण्यात आले.

6) गोवा ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले. घटकराज्य झाल्यानंतर गोव्याच्या विकासाला गती मिळाली. कमी काळातच गोवा एक विकसित राज्य म्हणून देशात पुढे आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com