Goa Ghumat Arati: मोनी चाल, चंद्रावळ सुवारी सोबत रंगतेय 'घुमट आरती'... जाणून घ्या 'या' अनोख्या परंपरेचा इतिहास

संपूर्ण गोव्यात शास्त्रशुद्ध घुमट वादन फक्त आडपाई गावातच केले जाते असे विनायक आखाडकर मोठ्या अभिमानाने सांगतात.
Vinayak Fadate Aakhadkar
Vinayak Fadate AakhadkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ghumat Aarti घुमट आरतींशिवाय गोव्यामध्ये गणेश चतुर्थीचा सण पुर्ण होत नाही. हल्लीच्या काळात महिलासुद्धा या घुमट आरतींमध्ये सहभाग घेतात. या घुमट विषयी जाणून घेण्याच्या उद्देशाने जेव्हा माशेल गावातील विनायक विठ्ठल फडते आखाडकर यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

घुमट क्षेत्रात आखाडकर मास्तरांचे नाव खूप आदराने घेतले जाते. गोव्यातील कित्येक विद्यार्थी त्यांनी घडविले आहे. गावोगावी जाऊन कार्यशाळा घेणे आणि घुमट वाद्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचे काम ते गेली कित्येक वर्षे प्रामाणिकपणे करीत आले आहेत.

Vinayak Fadate Aakhadkar
Goa Theft Case: अजब चोरीची गजब कहाणी! अपघातग्रस्त ट्रक, पोलिसांचा पंचनामा आणि पट्ठ्याचा प्रयत्न...

मास्तर असे सांगतात की संगीत ही निसर्गाची देणगी आहे. ऊन, पाणी, हवा, पाऊस यांच्यापासूनच सुर, लय, ताल यांची उत्पत्ति होते. त्यामुळे कुठल्याच वाद्यावर कुणीच हक्क सांगू नये असा संदर्भ अरविंद मुळगांवकर यांनी तबल्यावर लिहिलेल्या एका पुस्तकात सापडतो.

घुमट हे एक लोकवाद्यं आहे. जरी त्याला राज्य सरकारकडून राजाश्रय मिळाला असला तरी गोव्यासहित सिंधुदुर्ग आणि कर्नाटकात देखील घुमट वेगवेगळ्या पद्धतीने वाजविले जाते.

मातीपासून बनविलेल्या माटात घुमणारा आवाज म्हणून या वाद्याला ‘घुमट’ असे म्हटले जाते. घुमट वाद्य चार प्रकारात मिळते पैकी नेहमीच्या वापरात असलेल्या घुमटाचा आकार हा मंदिराच्या कळसा सारखा असतो. कदाचित पूर्वजांनी या मंदिराच्या कळसाला डोळ्यांसमोर ठेऊनच 'घुमट' घडविले असेल असे आखाडकर मास्तर सांगतात.

Vinayak Fadate Aakhadkar
Goa Farming: शेतीसाठी पोषक ठरतोय पाऊस

जसे तबला, मृदंग, संवादिनी शिकत असताना ताल, लय, मात्रा शिकविल्या जातात तसेच घुमटाच्या देखील ताल आणि मात्रा असतात. ज्यामुळे घुमट शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकता येते. लयभास्कर म्हणून ओळखले जाणारे खाप्रूमाम पर्वतकर यांनी या घुमटाला शास्त्राचा आधार दिला.

त्यांनी आपल्या शिष्यांना सोबत घेऊन ‘चंद्रावळ सुवारी वादन’ हा प्रकार तयार केला. शिमगोत्सव काळात नाट्यमंडपात नाटक सुरूहोण्याआधी हा प्रकार काही गावामध्ये अजूनही वाजविला जातो. त्यामध्ये ‘मोनी चाल’ म्हणजे मुक्याने केलेले वादन, त्यानंतर देवाला नमन, चंद्रावळ सुवारी ची चार कडवी, नानाविध पदे आणि शेवटचे खाण पद असा याचा प्रकार आहे. यामध्ये खाण पदाच्या अगोदर ‘फाग’ म्हणून एक गायन प्रकार होता जो आता लुप्त झालेला आहे.

विलंबित लय, मध्य लय आणि धृत लय असे शस्त्रात सांगितलेले लयींचे प्रकार यामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या शिष्यांनी ह्या वंदन प्रकारचा प्रसार आणि प्रचार केला. आडपई, डोंगरी, सांवयवेरे येथे अजूनही चंद्रावळ सुवारी वादन केले जाते.

२५ वर्षांपूर्वी जसे चंद्रावळ सुवारी वादन केले जायचे तीच परंपरा अजूनही आडपई सारख्या गावात जपली आहे. पूर्वजांनी ज्या पद्धतीने घुमट आरत्यांची परंपरा घालून दिली आहे, ती जशीच्या तशी या गावातल्या तरुण पिढीने जपून ठेवली आहे. संपूर्ण गोव्यात शास्त्रशुद्ध घुमट वादन फक्त आडपाई गावातच केले जाते असे विनायक आखाडकर मोठ्या अभिमानाने सांगतात.

घुमट बसून नव्हे तर उभे राहून वाजविण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यानुसारच त्याची बांधणी केली गेली आहे. कालांतराने स्पर्धा सुरू झाल्यावर घुमट बसून वाजवायला सुरवात झाली. पण खरी शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे घुमट उभे राहून गळ्यात घालून वाजविले जाते. बार्देश, माशेल सारख्या गावामध्ये अजूनही घुमट उभे राहून वाजवितात.

हल्लीच्या दहा वर्षांच्या काळात नावीन्यतेच्या नावाखाली जे घुमट बडविणे सुरू आहे ते खूपच दुर्भाग्यपूर्वक आहे. सुरवातीच्या काळात घुमटांचे नाद हे सुमधुर असायचे पण आता तेच कर्कश वाटतात. जसे आपण एखाद्या लहान बाळाच्या पाठीवरून मायेने हात फिरवितो त्याचप्रमाणे घुमटावर सुद्धा फिरविला पाहिजे परंतु आता त्याची खूप कमतरता दिसून येते.

आताच्या नवीन प्रशिक्षकांनी आधी स्वतः व्यवस्थित शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. नावीन्यतेच्या नावाखाली दोन्ही हातानी घुमट वाजवणे हे एकदम चुकीचे आहे. अभिजात पारंपरिक भजन किंवा नाट्यसंगीताचे वादन हे अजूनही जसेच्या तसे आहे मग घुमट प्रकारात नाविन्यता आणण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला असा सवाल आखाडकर मास्तर करतात.

आमच्या पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा जपुन ठेवा आणि पुढच्या पिढीपर्यन्त ती शास्त्रोक्त पद्धतीने पोहोचवा. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. माझ्या गुरूंकडून शिकलेली ताल-मात्रा मला आयुष्यभर उपयोगी पडली. त्यानुसार गोव्यातील कुठल्याही तालवाद्यांची नोटेशन मी तयार करू शकतो. पण आपल्या पूर्वजांचे मन दुखेल अशी कोणतीच गोष्ट करू नका.

विनायक विठ्ठल फडते (आखडकर), घुमट प्रशिक्षक, माशेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com