
पणजी: गोव्याच्या व्यावसायिक क्षेत्राला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘गोवा स्टार्टअप पॉलिसी’ उल्लेखनीय ठरल्याचे आकड्यांवरून दिसते. गोव्यात धोरण लागू झाल्यापासून आत्तापर्यंत तब्बल ५७५ स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. यापैकी १२५ नवकल्पना - स्टार्टअप्सना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य मिळाले असून त्यासाठी एकूण ३.३ कोटींपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.
या योजनांमुळे गोव्यातील (Goa) नवकल्पनांना प्रोत्साहन देत उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सरकारच्या वतीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. गोव्याचे आर्थिक क्षेत्र अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे. स्टार्टअप्ससाठीच्या विविध योजनांमुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सरकारच्या या धोरणात्मक प्रयत्नांमुळे राज्यात एक सकारात्मक आर्थिक वातावरण निर्माण झाले आहे. गोवा स्टार्टअप पॉलिसी राज्याला नवकल्पनांचे हब बनविण्यासाठी प्रभावी ठरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी २०२१ साली १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर दरवर्षी भारतातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्ये सरकारी तसेच बिगरसरकारी संघटनांचा सहभाग देखील असतो.
गोवा (Goa) स्टार्टअप सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत यांनी गोव्यातील उद्योजकतेच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, स्टार्टअप्सने आपल्या देशाच्या आर्थिक विकासात आणि नवकल्पनांच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. गोव्यातील स्टार्टअप्सने दाखवून दिले आहे की, नवकल्पनांच्या बळावर आर्थिक विकास शक्य आहे. प्रत्येक उद्योजक आपल्या कल्पना साकार करत असताना केवळ स्वतःसाठी नव्हे तर आपल्या समाजासाठी आणि देशासाठी योगदान देत असतो. गोवा उद्योजकतेचा विकास आणि नवकल्पना यासाठी आदर्श ठिकाण ठरत आहे. नवउद्यमींनी आपल्या कल्पनांना उंची देण्यासाठी येथे असलेल्या सहकार्यात्मक संधींचा पुरेपूर उपयोग करावा.
गोव्याचे आकर्षक वातावरण, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्रातील जागतिक ओळख या पार्श्वभूमीवर स्टार्टअप्ससाठी गोवा हे एक आदर्श केंद्र म्हणून उदयास येत आहे. नवउद्यमांना यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, धोरणात्मक पाठबळ, तसेच गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यात गोवा आघाडीवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.