गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकाचे व्रत सर्व स्त्रिया ठेवतात. अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिकेचे पूजन करून उपवास ठेवतात. तर कुमारिका आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात.
हरितालिकाच्या दिवशी घरामध्ये महादेव व गौरीचे पूजन केले जाते. त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा बेत आखला जातो. ज्या घरामध्ये ह्या व्रताचे पूजन होते तिथे महादेवांसाठी वरण-भात,पायस तर गौरीसाठी पाच पाल्यांची भाजी, मुगाचे कण्ण आणि पातोळ्यांचा नैवैद्य दाखविला जातो.
सर्वच घरांमध्ये पाळले किवा पूजले जात नाही. बहुतेकवेळा हरतालिका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पूजली जाते. पण कधी कधी तिथीप्रमाणे हे व्रत गणेश चतुर्थीच्याच दिवशी आले तर मात्र महिलावर्गावर नैवैद्य करण्याचा ताण पडतो.
हरीता म्हणजे जिला नेले आणि लिका म्हणजे सखी. महादेवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला तिची सखी तपश्चर्येला घेऊन गेली होती म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ म्हणतात. भगवान शंकराला आपला वर बनविण्यासाठी भाद्रपद महिन्यातील तृतीयेच्या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवून निराहरी पूजेला सुरवात केली त्यावेळी हस्त नक्षत्र होते. तिच्या या तपाला प्रसन्न होऊन महादेवांनी तीला वरले. म्हणून हे व्रत कुमारिका आपल्या मनासारखा पाती मिळवा यासाठी करतात.
हरितालिकाच्या दिवशी सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित पूजा केली जाते. यावेळी बेल,दूर्वा,पत्री वाहून षोडओपचार पूजा केल्यावर कथावाचन करतात. त्यानंतर आरती झाली की पाच प्रकारच्या पालेभाज्यांचा नैवैद्य त्यांना दाखविला जातो.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाजारात विकण्यास आलेल्या भाज्यांसोबत हरितालिकाच्या व्रतासाठी लागणाऱ्या गावठी पालेभाज्या देखील विक्रीसाठी उपलब्ध असतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या खास पालेभाज्या गोव्यातील गावठी भाजीविक्रेत्यांकडेच उपलब्ध असतात.
यामध्ये चुरणाचा पाला, हळसांदयाचा पाला, कुडडूची भाजी, टाकळा, शेंगाचा पाला अशा पावसात उगविणाऱ्या भाज्यांचा समावेश असतो. या पाच प्रकारच्या पालेभाजींच्या जुड्या बांधून विक्रीला ठेवल्या जातात.
हरितालिकाच्या व्रतांसाठी ह्या पालेभाज्या खूप महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दरम्यान त्यांचा खप देखील चांगला होतो. ज्या घरांमध्ये हे व्रत केले जाते तिथे हमखास या पालेभाज्या नैवैद्यात समाविष्ट केल्या जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी च्या दिवशी गणारायच्या आगमनाआधी पूजलेल्या हरितालिकांचे विसर्जन केले जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.