Ranji Trophy Cricket: सुयशच्या शतकानंतर गोव्याची हाराकिरी

Ranji Trophy Cricket Tournament : अखेरच्या सहा विकेट आठ धावांत गमावल्या
Ranji Trophy Cricket
Ranji Trophy CricketDainik Gomantak

Ranji Trophy Cricket Tournament : शतकवीर सुयश प्रभुदेसाई व के. व्ही. सिद्धार्थ सहजसुंदर फलंदाजी करत असताना गोव्याच्या संघाची सुस्थितीकडे वाटचाल होती.

मात्र तमिळनाडूच्या फिरकी गोलंदाजीसमोर यजमान फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट बहाल केल्या, त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गट सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाने वरचष्मा राखला.

सुयशने मोसमातील शानदार फॉर्म कायम राखताना यंदा मोसमातील पर्वरी येथील मैदानावरील दुसरे, तर एकंदरीत तिसरे शतक नोंदविले.

त्याने १०४ धावा करताना के. व्ही. सिद्धार्थ (६९) यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करून गोव्याच्या पहिल्या डावाला आकार दिला, मात्र चहापानानंतर घसरगुंडी उडाल्यामुळे यजमान संघाचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला.

तमिळनाडूचे डावखुरे फिरकी गोलंदाज कर्णधार आर. साई किशोर व एस. अजित राम यांनी अनुक्रमे चार व तीन गडी बाद केले. तमिळनाडूने शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर बिनबाद २० धावा केल्या.

पदार्पण करणाऱ्या एस. लोकेश्वर याला अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद केले, परंतु तो चेंडू नोबॉल ठरल्याने तमिळनाडूचा सलामीवीर नशिबवान ठरला.

Ranji Trophy Cricket
Carnival Goa 2024: ठरलं! यंदाचा 'किंग मोमो' क्लाईव्ह अँथनी ग्रासियस; सहाजणांच्या ऑडिशनमधून झाली निवड

खराब सुरवातीनंतर डाव सावरला

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र गोव्याची सुरवात खूपच खराब झाली. सलामीचा ईशान गडेकर तिसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या मंथन खुटकर (४) याचा संघर्ष संपुष्टात आला.

या दोघांना वेगवान गोलंदाज संदीप वरियर याने बाद केले, तेव्हा धावफलकावर फक्त आठ धावा होत्या. त्यानंतर सुयशही नशिबवान ठरला. तो दोन धावांवर असताना साई किशोरच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये जीवदान मिळाले,

त्याला लाभ उठवत खाते उघडण्यासाठी २४ चेंडू घेतलेल्या सुयशने स्विप फटक्यांचा खुबीने वापर केला. उपाहारानंतर त्याने व सिद्धार्थने आक्रमक फलंदाजी केली.

चहापानापूर्वी अजित राम याने सिद्धार्थला पायचीत बाद केल्याने जमलेली भागीदारी फुटली. सिद्धार्थने ६९ धावा करताना १४२ चेंडूंतील खेळीत आठ चौकार व दोन षटकार मारले.

Ranji Trophy Cricket
Pollution Control Board: गोव्याची परिसंस्था निर्माण करण्याची क्षमता कचरा उद्योजकांमध्ये; मात्र आव्हाने समजून घेण्याची गरज

अनपेक्षित घसरगुंडी

चहापानाला खेळ थांबला तेव्हा सुयश शतकापासून १२ धावा दूर होता व गोव्याची ३ बाद १८० अशी तुलनेत चांगली स्थिती होती. साई किशोरच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत २६ वर्षीय सुयशने कारकिर्दीतील एकूण पाचवे शतक पूर्ण केले.

त्यानंतर मात्र गोव्याची अनपेक्षित अनपेक्षित घसरगुंडी उडाली. संघाचे द्विशतक झाल्यानंतर दर्शनने साई किशोरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक जगदिशनकडे झेल दिला. धावसंख्येत आणखी २८ धावांची भर पडल्यानंतर गोव्याचे फलंदाज सैरभैर झाले.

शतकानंतर अजित रामच्या गोलंदाजीवर सुयशचा स्विपचा प्रयत्न चुकला व तो पायचीत बाद झाला. नंतर साई किशोरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका चुकल्यानंतर दीपराज गावकरने पुन्हा तसाच प्रयत्न केला आणि विकेट फेकली.

दोन्ही पंचांनी सल्लामसलत करून दीपराजला झेलबाद दिले. धाव पूर्ण कशी करायची हे माहीत नसल्याप्रमाणे धावलेला अर्जुन तेंडुलकर धावचीत झाला.

प्रत्येक चेंडू उंचावरून मारायचा असतो या भ्रमातील मोहित रेडकरने एम. महंमद याला झेल पकडण्याचा सराव दिला. लक्षय गर्ग व हेरंब परब यांना तीन चेंडूत बाद करून साई किशोरने गोव्याचा डाव संपविला.

यजमान संघात तीन बदल, त्रिपाठी १५ सदस्यांतही नाही!

पंजाबविरुद्ध मागील लढतीत पराभूत झालेल्या गोव्याने संघात आज तीन बदल केले. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या अनुभवी स्नेहल कवठणकरची जागा मंथन खुटकरने घेतली.

विकेट मिळत नसलेल्या विजेश प्रभुदेसाईच्या जागी लक्षय गर्ग संघात आला, तर महाराष्ट्रातील ‘पाहुणा’ राहुल त्रिपाठी साफ अपयशी ठरल्यामुळे त्याच्यासाठी यष्टिरक्षक मंथन खुटकर याला संधी देत सिद्धार्थ यांच्या खांद्यावरील यष्टिरक्षणाचा अतिरिक्त भार कमी करण्यात आला. १४.२०च्या सरासरीने फक्त ७१ धावा केलेल्या त्रिपाठीला १५ सदस्यीय संघातही जागा देण्यात आली नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ७५.५ षटकांत सर्वबाद २४१ (सुयश प्रभुदेसाई १०४, ईशान गडेकर ०, मंथन खुटकर ४, के. व्ही. सिद्धार्थ ६९, दर्शन मिसाळ २१, दीपराज गावकर १७, अर्जुन तेंडुलकर १, समर दुभाषी नाबाद ३, मोहित रेडकर २, लक्षय गर्ग २, हेरंब परब ०, संदीप वरियर २-४५, आर. साई किशोर ४-७३, एस. अजित राम ३-४६).

तमिळनाडू, पहिला डाव ः ७ षटकांत बिनबाद २० (सुरेश लोकेश्वर नाबाद १५, नारायण जगदिशन नाबाद ३).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com