Ranji Cricket: गोव्यासमोर त्रिशतकी धावांचे आव्हान

Ranji Cricket: रेल्वेविरुद्ध जिंकण्यासाठी आणखी 213 धावांची गरज
Suyash Prabhudesai
Suyash PrabhudesaiDainik Gomantak

Ranji Cricket: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याने कधीही त्रिशतकी धावांचे विजयी आव्हान पेललेले नाही. फक्त एकदाच त्यांनी द्विशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलेला आहे.

आता रेल्वेविरुद्ध एलिट क गट सामना जिंकण्यासाठी 306 धावांचे आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांनी रविवारी तिसऱ्या दिवसअखेर 1 बाद 93 धावा केल्या. सोमवारी सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी आणखी 213 धावा करणे आवश्यक आहे.

सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडिमयवर सामना सुरू आहे. रविवारी चहापानापूर्वी दर्शन मिसाळ याने शानदार डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने चार गडी टिपले, तसेच सकाळच्या सत्रात लक्षय गर्ग व हेरंब परब या वेगवान गोलंदाजांच्या जबरदस्त माऱ्यामुळे रेल्वेचा दुसरा डाव २०८ धावांत आटोपला.

त्यांच्यापाशी पहिल्या डावातील ९७ धावांची आघाडी होती. त्यामुळे गोव्याला विजयासाठी ३०६ धावांचे लक्ष्य निश्चित झाले. पहिल्या डावात अर्धशतक केलेल्या अमोघ देसाईला डावखुरा फिरकी गोलंदाज आकाश पांडे याच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक उपेंद्र यादव याने झेलबाद केले.

त्यानंतर यंदा फलंदाजीत संघाचा आधारस्तंभ ठरलेल्या सुयश प्रभुदेसाईने नाबाद अर्धशतक झळकावत बढती दिलेल्या स्नेहल कवठणकर याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची अभेद्य भागीदारी केली.

सुयशने ८८ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद ५४, तर स्नेहलने ५४ चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद २३ धावा केल्या आहेत. गोव्याचा फलंदाजीतील आत्मविश्वास कायम राहिल्यास संघाला सोमवारी चमत्काराची संधी राहील.

आशुतोषचा हल्ला, तरीही गोलंदाज प्रभावी

एलिट क गटातील मोहिमेत यापूर्वी निस्तेज ठरलेल्या गोव्याच्या वेगवान गोलंदाजीला रविवारी सकाळी धार चढली. लक्षय व हेरंबने प्रत्येकी दोन गडी टिपत रेल्वेची स्थिती ४ बाद ६९ अशी केली.

लक्षयने उपेंद्र यादवला त्रिफळाचीत बाद करताना टाकलेला चेंडू अफलातून होता. पहिल्या डावात ९१ धावा केलेल्या रेल्वेच्या कर्णधाराला भोपळाही फोडता आला नाही. उपाहारानंतर आशुतोष शर्मा याने प्रतिहल्ला चढविल्याने रेल्वेला द्विशतक गाठता आले.

तरीही गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या वाढणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे आशुतोषसह रेल्वेचे अखेरचे ४ गडी १६ धावांत, त्यापैकी ३ विकेट फक्त ५ धावांत गारद झाल्या. आशुतोषने ९३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक:-

रेल्वे, पहिला डाव: २९७

गोवा, पहिला डाव: २००

रेल्वे, दुसरा डाव (बिनबाद ३१ वरून): ६३.३ षटकांत सर्वबाद २०८ (विवेक सिंग २१, सूरज आहुजा २१, प्रथम सिंग २८, साहब युवराज सिंग ३४, आशुतोष शर्मा ८१, युवराज सिंग १०, लक्षय गर्ग १६-२-५३-२, हेरंब परब १४-२-४२-२, फेलिक्स आलेमाव ३-०-१९-०, दीपराज गावकर ३-०-९-०, मोहित रेडकर ११-२-४०-१, दर्शन मिसाळ १६.३-३-४४-४).

गोवा, दुसरा डाव: ३१ षटकांत १ बाद ९३ (सुयश प्रभुदेसाई नाबाद ५४, अमोघ देसाई १३, स्नेहल कवठणकर नाबाद २३, आकाश पांडे १-२९).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com