Indian Women's League 2: गोव्याच्या एफसी तुये संघाने इंडियन वूमन लीग 2 (आयडब्ल्यूएल) फुटबॉल स्पर्धेत क गटातून आगेकूच राखताना शनिवारी सलग चौथ्या विजयाची नोंद केली. त्यांनी गुजरातमधील एसएजी फुटबॉल अकादमीचा 6-1 फरकाने धुव्वा उडविला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. क गट विजेतेपदासह तुये संघ स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला.
फुटबॉल पदाधिकाऱ्याकडून संघातील दोघा खेळाडूंचा विनयभंग व मारहाण प्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार, आरोपीला अटक या पार्श्वभूमीवरही हिमाचल प्रदेशमधील खाड फुटबॉल क्लबने 3-0 फरकाने विजयाची नोंद केली.
या लढतीत प्रतिस्पर्धी हरियानातील सिटी बहादूरगड एफसी संघ आठ खेळाडूंसह खेळला. प्राप्त माहितीनुसार, गोव्यातील स्पर्धेसाठी सिटी बहादूरगड संघ 20 खेळाडूंसह आला होता, पण अखेरचा साखळी सामना बाकी असतानाही या संघातील 12 खेळाडू हरियानातील राज्यस्तरीय सीनियर महिला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माघारी गेले.
त्यामुळे खाड एफसीविरुद्ध त्यांना फक्त आठ खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले. या संदर्भात क्लबने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला लेखी कळविले.
दरम्यान, एफसी तुये संघाच्या विजयात पुष्पा परब (२८ व ७८वे मिनिट) व लक्ष्मी तमांग (४७ व ५६वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर पर्ल फर्नांडिस (५ वे मिनिट) व अॅनिएला बार्रेटो (६९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. एसएजी फुटबॉल अकादमीचा एकमात्र गोल शांती ओडेदरा हिने इंज्युरी टाईममध्ये केला.
सलग चार विजयांसह तुये अव्वल
स्पर्धेच्या क गटात एफसी तुये संघाने सर्व चारही सामने जिंकून १२ गुणांसह अव्वल स्थान राखले आणि गटात विजेतेपद प्राप्त केले.
एसएजी फुटबॉल अकादमीने तीन विजयांसह नऊ गुण, तर सेल्टिक क्वीन्स संघाने दोन विजयांसह सहा गुण नोंदविले. खाड एफसीने एका विजयासह तीन गुण प्राप्त केले, तर सिटी बहादूरगड संघाला चारही सामन्यांत पराभूत व्हावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.