
C. K. Naidu Trophy: गोव्याच्या लखमेश पावणे याने चिवट 48 धावांची खेळी केल्यानंतर वेगवान गोलंदाजीतही चमक दाखविली. त्यामुळे तमिळनाडूची 5 बाद 62 अशी घसरगुंडी उडाली.
मात्र आर. एस. मोकित हरिहरन याने शतक नोंदविताना एस. महंमद अली याच्यासमेवत झुंजार दीडशतकी भागीदारी केली.
त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात दोन्ही संघांत सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी कमालीची चुरस राहिली.
तमिळनाडूचा संघ अजून 11 धावांनी मागे असून त्यांच्या पहिल्या डावातील दोन विकेट बाकी आहेत.
सांगे येथील जीसीए मैदानावर लखमेश याच्या नाबाद 48 धावांच्या (75 चेंडू, 5 चौकार, 1षटकार) बळावर कालच्या ८ बाद २२८ वरून गोव्याने २७६ धावा केल्या. नंतर लखमेश व शुभम तारी यांनी १९व्या षटकात तमिळनाडूची पहिल्या डावात ५ बाद ६२ अशी दयनीय स्थिती केली.
नाजूक परिस्थितीत आर. एस. मोकित हरिहरन (१२७ धावा, १२४ चेंडू, २२ चौकार, १ षटकार) याने झंझावाती शतक ठोकताना एस. महंमद अली (९१ धावा, १४९ चेंडू, १० चौकार, २ षटकार) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे तमिळनाडूला सव्वादोशने धावांचा टप्पा ओलांडता आला.
पार्ट टाईम गोलंदाज कौशल हट्टंगडी याने हरिहरन याला लखमेश याच्याकरवी झेलबाद करून मोठा अडथळा दूर केला. नंतर दिवसातील तीन षटके बाकी असताना तमिळनाडूला आणखी दोन धक्के बसले.
त्यामुळे दिवसअखेर त्यांनी ८ बाद २६५ अशी स्थिती झाली. लखमेशने महंमद अली याला त्रिफळाचीत बाद केले, तर पी. विद्युत याच्या यष्ट्यांचा वेध कर्णधार राहुल मेहता याने घेतला.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव (८ बाद २२८ वरून) १०५.१ षटकांत सर्वबाद २७६ (लखमेश पावणे नाबाद ४८, जगदीश पाटील १०, शुभम तारी १, सी. व्ही. अच्युत २-४३, एस. लक्षय जैन ५-८७, पी. विद्युत २-७७).
तमिळनाडू, पहिला डाव: ६५ षटकांत ८ बाद २६५ (एस. आर. आतिश १४, शुभांग मिश्रा १३, आर. एस. मोकित हरिहरन १२७, एस. महंमद अली ९१, शुभम तारी १५-३-५२-२, लखमेश पावणे १४-४-५७-४, अभिनव तेजराणा २-०-३-०, जगदीश पाटील ४-०-३०-०, मनीष काकोडे ११-०-५२-०, राहुल मेहता १७-२-६३-१, देवन चित्तेम १-०-१-०, कौशल हट्टंगडी १-०-७-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.