Chess Tournament: अभिमानास्पद कामगिरी! ऋत्विज परब बनला सातवा गोमंतकीय ‘इंटरनॅशनल मास्टर’

गोव्याचा सातवा बुद्धिबळपटू: किताबासाठी आवश्यक 2400 एलो गुणांना गवसणी
Ritwij Parab
Ritwij ParabDainik Gomantak
Published on
Updated on

Chess Tournament आवश्यक असलेल्या 2400 एलो गुणांना गवसणी घातल्यानंतर मडगावचा ऋत्विज परब आता इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू बनला आहे. या किताबाचा मान मिळविणारा तो सातवा गोमंतकीय असून सासष्टी तालुक्यातील तिसरा बुद्धिबळ खेळाडू ठरला.

आर्मेनिया येथे सुरू असलेल्या साघ्काझोर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विजने २४०० एलो गुणांचे लाईव्ह रेटिंग गाठले. त्यामुळे तो आयएम किताबधारक बनला. लवकरच त्याच्या किताबावर ‘फिडे’तर्फे शिक्कामोर्तब केले जाईल.

ऋत्विज याच्यापाशी आयएम किताबासाठी आवश्यक तिन्ही नॉर्म होते, परंतु त्याने २४०० एलो गुणांचा टप्पा गाठला नव्हता. आर्मेनियातील स्पर्धेपूर्वी ऋत्विजचे २३९२ एलो गुण होते.

गुरुवारी त्याने भारतीय ग्रँडमास्टर सेतुरामन याला बरोबरीत रोखून लाईव्ह रेटिंगमध्ये २४०० गुणांना गाठले. ऋत्विजपाशी सध्या ‘फिडे मास्टर’ (एफएम) किताब आहे.

यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ऋत्विज याने अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आयएम किताबासाठी हवा असलेला तिसरा नॉर्म प्राप्त केला होता.

त्यापूर्वी २०१५ साली बँकॉकमधील स्पर्धेत ऋत्विजने आयएम किताबाचा पहिला नॉर्म मिळविला होता, नंतर २०१८ साली जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळ स्पर्धेत त्याने दुसऱ्या नॉर्मची कमाई केली.

आयएम बुद्धिबळपटू बनल्याबद्दल ऋत्विजचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ऋत्विजच्या बुद्धिबळ वाटचालीत साथ दिलेल्या सर्वांचे त्याच्या पालकांतर्फे शैलजा परब यांनी आभार मानले आहेत.

ग्रँडमास्टर अनुराग म्हामल, रोहन आहुजा, ग्रँडमास्टर लिऑन मेंडोन्सा, भक्ती कुलकर्णी, अमेय अवदी, नीतिश बेलुरकर हे यापूर्वीचे गोव्याचे आयएम बुद्धिबळपटू आहेत.

Ritwij Parab
Women's T20 Cup Cricket: गोव्याच्या महिलांचा विजयी ‘चौकार’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com