37th National Games: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये सांघिक पुरुष विभागात सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत सलग विजय नोंदवत आगेकूच राखली.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अ गटातील पहिल्या लढतीत आसामला सहजपणे हरविले. नंतर त्यांनी यजमान गोव्याला 4-1 फरकाने नमवून सलग दुसरा विजय नोंदविला. गोव्याविरुद्ध महाराष्ट्राच्या रोहन गुरबानी याने पहिला एकेरीचा सामना जिंकून सुरेख सुरवात केली.
मात्र आर्य भिवपाठकी याला एच. अरुणेश याच्याकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 1-1 अशी बरोबरी झाली. नंतर दुहेरीत दीप रंभिया व अक्षय शेट्टी यांनी अर्जुन फळारी व महंमद रेहान जोडीला हरविल्यामुळे महाराष्ट्राला आघाडी मिळाली.
दर्शन पुजारी याने राहुल देसवाल याला नमवून महाराष्ट्राला 3-1 अशी विजयी आघाडी प्राप्त करून दिली. अखेरच्या दुहेरीत विप्लव कुवळे व विराज कुवळे जोडीने तेजन फळारी व एच. अरुणेश जोडीला तीन गेममध्ये हरवून महाराष्ट्राच्या अंतिम फेरीतील जागेवर शिक्कामोर्तब केले.
पुरुषांच्या ब गटात कर्नाटकने उत्तराखंडला नमवून चांगली सुरवात केली होती. नंतर त्यांनी दिल्लीला 4-1 असे हरवून अंतिम फेरी निश्चित केली. दिल्लीविरुद्ध पहिल्या एकेरीत कर्नाटकच्या एस. भार्गव याला कार्तिकेय गुलशन कुमार याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
नंतर के. पृथ्वी रॉय अर्जुन रेहानी याला नमवून कर्नाटकला बरोबरी साधून दिली. दुहेरीत एच. व्ही. नितीन व के. साई प्रतीक जोडीने दिल्लीच्या स्वर्णराज बोरा व कौस्तुभ रावत जोडीस नमविले.
तर नंतरच्या एकेरीत आयुष शेट्टी याने अभिन वसिष्ठ याला नमवून कर्नाटकची आघाडी ३-१ अशी बळकट केली. दुहेरीत के. पृथ्वी रॉय व असित सूर्या यांनी नितीन कुमार व हर्ष राणा जोडीवर नोंदवलेल्या विजयामुळे कर्नाटकने सलग दुसरा विजय नोंदविला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.