Goa News : परंपरेनुसार साऱ्यांना मान; अधिकार भंडारी ज्ञातीकडे,भंडारी समाज बैठकीत ठराव

Goa News : महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या रथोत्सवात सर्वप्रथम रथावर श्रीफळ केवळ देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडूनच ठेवले जाईल, असे ठराव हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिराच्या सभामंडपात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
Shri rudreshwar devasthan
Shri rudreshwar devasthanDainik Gomantak

Goa News :

साखळी, हरवळे येथील श्री रूद्रेश्वर मंदिरात दरवर्षी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवात पूर्वपरंपरेनुसार चालत आलेले मान व हक्क वरचे हरवळे येथील सातेरकर, केळबाईकर आणि जोगसकर या तिन्ही गटांना मिळणार आहेत.

परंतु रुद्रेश्वर देवस्थान हे भंडारी समाजाचेच असल्याने इतर सर्व हक्क व अधिकार समितीकडे राहतील. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या रथोत्सवात सर्वप्रथम रथावर श्रीफळ केवळ देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडूनच ठेवले जाईल, असे ठराव हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिराच्या सभामंडपात आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले.

तसेच १० एप्रिलला सकाळी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांच्या उपस्‍थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलेली तडजोड आम्हाला मान्य नाही. बुधवारच्‍या बैठकीतील चर्चेनंतर तयार करण्यात आलेला इतिवृत्तांत या बैठकीत फेटाळून लावण्यात आला, तसे जाहीर करण्‍यात आले. बैठकीनंतर देवस्थान समिती व महाजनांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती समितीचे सचिव सुभाष किनळकर यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष यशवंत माडकर, सचिव संगेश कुंडईकर, उपाध्यक्ष दीपक नाईक, वासुदेव गावकर, उपेंद्र गावकर, काशिनाथ मयेकर व इतरांची उपस्थिती होती. गेल्या ७ एप्रिलला झालेल्या पालखी सोहळ्यावेळी गोंधळ माजवून असभ्य वर्तन केलेल्या, विघ्ने आणण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांवर देवस्थान समितीतर्फे सादर करण्यात आलेल्या तक्रारी कोणत्याही परिस्थितीत मागे घेतल्या जाणार नाही. उलट त्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे पोलिसांना किंवा न्यायालयाला देऊन सदर तक्रारी व खटले अधिक मजबूत केले जाणार आहेत.

प्रत्येक तालुक्यात समिती

श्री रुद्रेश्वर देवस्थान स्वीकृत समितीच्या यापुढील निर्णयांमध्ये सहभागी होऊन देवस्थानची सर्व कामे सर्वानुमते सुरळीत व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच जणांच्या सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या पुढील सर्व निर्णय देवस्थान समिती व सल्लागार समित्यांच्या समन्‍वयातून होतील, असे सांगण्यात आले.

मोठ्या संख्येने भंडारी प्रतिनिधींची उपस्थिती

तोडगा बैठकीनंतर संपूर्ण गोव्यातील भंडारी समाजात धुसफूस सुरू झाली होती. पालखी सोहळ्यावेळी उडालेला गोंधळ, महिलांशी करण्यात आलेले असभ्य वर्तन, लोकांवर मारण्यात आलेल्या खुर्च्या याकडे कसे दुर्लक्ष करता येईल, असा सवाल सर्वत्र उपस्थित होऊ लागल्यानंतर आजच्या बैठकीला वेगळेच महत्त्व होते. त्यानुसार या बैठकीला संपूर्ण गोव्यातील मोठ्या संख्येने भंडारी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Shri rudreshwar devasthan
Goa Congress: काँग्रेसमध्ये दुही? चोडणकर म्हणतात... 'फक्त लोहिया मैदानावर बोलावले'

महाजन यादीत नव्‍या भंडारी बांधवांना घ्‍यावे

उपरोक्‍त देवस्थानचे प्रकरण न्यायालयात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी महाजनांची यादी तयार करावी. तसा आदेश २०१७ मध्ये झाला आहे. परंतु प्रशासकीय पातळीवरून कालापव्‍यय झाला.

या विषयी पाठपुरावा करून देवस्थान समितीचे अध्यक्ष व इतर ७७ जणांनी सादर केलेल्या खटल्याप्रमाणे राज्‍यातील भंडारी समाज बांधवांना महाजन करून घ्यावे.

तदनंतर देवस्थान समितीसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात यावी व नवीन समिती निवडली जावी, असाही ठराव घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com