
Goa Shigmo Festival 2025
गोवा हा पर्यटन, समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असला तरी येथील परंपरा आणि सण-उत्सवांची समृद्ध परंपरा देखील लक्षवेधी आहे. त्यापैकी एक प्रमुख पारंपरिक सण म्हणजे शिमगा. हा सण महाराष्ट्र व गोव्यातील हिंदू समाजात धूमधडाक्यानं साजरा केला जातो आणि तो गोव्यातील होळी उत्सवाचा एक भाग मानला जातो.
शिमगा सणात रात्रभर पारंपरिक नृत्य, गाणी, ढोल-ताशांचे वादन आणि गावागावांतून मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. गोव्यातील ग्रामीण भागात आजही या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
पूर्वी शिमगा गावापुरता मर्यादित होता, परंतु आता तो शहरी भागातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोमंतकीय आणि पर्यटक मिळून या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.
गोव्यातील शिमगा हा फक्त धार्मिक किंवा पारंपरिक सण नसून, तो लोकसंस्कृतीचा जिवंत उत्सव आहे. गोव्यातील प्रत्येक गावात आणि शहरात हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण त्यामागील सांस्कृतिक एकात्मता आणि लोकसहभाग हा त्याचा खरा गाभा आहे.
गणपती उत्सवाप्रमाणेच अत्यंत उत्साहाने साजरा होणारा व आवर्जून हजर राहून पाहण्यासारखा असा दुसरा गोव्यातील सण म्हणजे 'शिगमोत्सव'. धाकलो शिगमो (धाकटा) हा मुख्यतः जुन्या गोव्यात ग्रामीण भागात फाल्गुन पौर्णिमेआधी ५ दिवस सुरू होतो. तर व्हडलो शिगमो (मोठा) नव्या गोव्यात शहरी भागांत होळी पौर्णिमेला सुरू होऊन पुढे ५ दिवस चालतो.
पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ, रंगीबेरंगी कपडेपट व झेंडे घेऊन ढोल, ताशे, कासाळे इ. पारंपरिक वाद्यांच्या गजरांत निघालेल्या भव्य मिरवणुका, हा या उत्सवाचा खास आकर्षणाचा भाग असतो.
ग्रामीण भागांत देवळापुढील पटांगणांत गावकरी एकत्र येऊन नमनाची गाणी म्हणतात. त्यानंतर एकत्रितपणे अनेक पारंपरिक नृत्ये सादर केली जातात. तलगडी, हान्पेट, लॅम्पडान्स, गोफनृत्य असे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. त्यानंतर ५०-१०० लोकांचे हे 'मेळ' ढोलताशांच्या गजरांत गावांतील प्रत्येकाच्या दारांत मिरवणुकीने जातात. लोक स्वखुशीने त्यांना आर्थिक मदत करतात. एकमेकांवर गुलाल उधळून उत्सवाची सांगता होते.
अनेक गांवात विविध चालीरीती आहेत. जांबावली येथे होणारा गुलालोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्याशिवाय काणकोण येथील 'शीर्षारान्नी उत्सव’, चोडणचा ‘होमकुंड उत्सव’, कुंकळ्ळी येथील 'छत्रोत्सव' अशा अनेक प्रकारे शिमगा साजरा होतो.
जातिधर्मविरहित व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत साजरा होणारा व पारंपरिक लोककला व संस्कृतीचे जतन करणारा हा सण पाहण्यासाठी व त्यात भाग घेण्यासाठी देशांतीलच नव्हे तर विदेशांतील पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
शिगमा हा खऱ्या अर्थाने गोव्यातील देवांचा आणि त्यांना आत्मीयतेने भजणाऱ्या भाविकांचा लोकोत्सव असतो. शिगम्याच्या मांडावर गाण्यासाठी, नाचण्यासाठी अथवा लोकवाद्ये वाजवण्यासाठी सर्वांना मुक्तद्वार असते. मेळांत सहभागी होण्यासाठी कोणी कोणाला निमंत्रण देत नाही.
उस्फूर्तपणे ठरलेल्या परंपरेनुसार व ठरलेल्या संकेताप्रमाणे गावांतील आबालवृद्ध अशा मेळांत सहभागी होतात. कितीतरी आधीपासून यासाठी शिस्तबद्ध सराव गावोगावी दिसून येतो. त्याबरोबर ढोलताशांचा आवाजही दुमदुमू लागतो. शहरी भागांत गायन-नृत्य व नाटकांच्या तालमी सुरू होतात. घरांतील गच्चीवर रात्री उशिरापर्यंत या तालमीचा आवाज येत राहतो.
शिमगा सणाला गावोगावी कमिट्या स्थापन करून कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. खालील कार्यक्रम आयोजित करतात.
१) मेळ - ढोलताशांच्या गजरांत, आकर्षक पेहराव, रंगीबेरंगी फेटे घालून, हातात तरंग, पताका, अब्दागिरी घेऊन, लोक तालबद्ध नाचत-गात येतात. त्यांच्याबरोबर लोकवाद्यांचे पथकही असते.
२) चित्ररथ - विविध पौराणिक प्रसंगांवर आधारित भव्य चित्ररथ तयार केले जातात. बारीकबारीक तपशिलांवर काटेकोर लक्ष देऊन आपला चित्ररथ सर्वांत उत्तम कसा होईल याकडे कलाकारांचे लक्ष असते.
चित्ररथांत सीताहरण, लंकादहन, रामरावण युद्ध, पार्वती अपहरण, यज्ञरक्षण, इंद्रदेवाचा विजयोत्सव, कुबेर आक्रमण, श्री गणेश नौकाविहार, कालिया मर्दन, नरसिंह अवतार, वैकुंठास निघालेले संत तुकाराम - असे अनेक प्रसंग उभारलेले असतात.
३) लोकनृत्यपथके - यांत गोफनृत्य, धनगर नृत्य, कोळीनृत्य अशी अनेक पथके असतात.
४) विविध स्पर्धा - १) चित्रकला, २) मुखवटा रंगवणे, ३) मेहंदी, ४) रांगोळी, ५) वेशभूषा, ६) वक्तृत्व, ७) पाककला.
५) मनोरंजनात्मक कार्यक्रम - १) नाटक, २) नृत्य, ३) गायन, ४) वादन, ५) नकला, ६) नाट्यछटा.
गोव्यातील शिमगा हा एक अनोखा सांस्कृतिक उत्सव आहे जो लोकपरंपरा, नृत्य, संगीत आणि पारंपरिक श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ दर्शवतो. हा सण गावागावांतून मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.