दशरथ मोरजकर / पर्ये: अलीकडच्या काही दिवसांपर्यंत पारंपरिक शेती (Traditional farming) करून चरितार्थ चालविला. भातशेतीच्या मुख्य पिकासह पावसाळ्यात काटेकणगी, कारांदे, माडी, काकडी, चिबुड, दोडगी आदींची तर उन्हाळ्यात मिरची तसेच इतर भाजीपाल्याची शेती फुलवली (Agriculture phulavali). उन्हाळ्यातील काजू पीक, काटेकणगी व इतर काही पिकांची विक्री करून वर्षभर लागणार खर्च जेमतेम मिळत असे. कधी कधी शेतमजुरीही केली. पण तीन मुलांसह त्यांच्या एकूण सहाजणांच्या कुटुंबाची गरज महागाईच्या काळात वाढू लागली. त्यामुळे आर्थिक टंचाई (Economic scarcity) निर्माण होऊ लागली. पण या परिस्थितीतही न डगमगता त्यांनी कास धरली शेतीतून स्वयंरोजगाराची.(Self-employment from agriculture) स्वतःच्या जमिनीत शेतीचे उत्पन्न वाढवून ते स्वतः जाऊन बाजारपेठेत विकणे असे त्यानी काम आरंभले आणि त्यातून रोजगाराचे नवीन साधन निर्माण केले आहे. ही स्फूर्तिदायक कथा आहे सत्तरीतील पेळावदा-रावण येथील रत्नाकांत सावंत (Ratnakant Sawant) व रेखा सावंत (Rekha Sawant) या दाम्पत्याची. आणि त्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती रेखा सावंत यांनी.
बाजारपेठेत सध्या स्थानिक पिकांना मोठी मागणी आहे. याची जाणीव झाली तेव्हा रेखा यांनी आपल्या शेतात पिकणाऱ्या पिकांची बाजारपेठेत बसून विक्री करण्याचे ठरवले आणि आपल्यासाठी स्वयंरोजगार निर्माण केला. सध्या हे सावंत कुटुंब भातशेती, भाजीपाला व कंदमुळे आदी बाराही महिने शेती करतात व त्या-त्या पिकांची साखळी बाजारात बसून विक्री करतात. त्यांच्याकडून घेण्यात येणारे वर्षभराचे पीक यात, उन्हाळी भात शेती भेंडी, फणस, पावसाळ्यात चिबुड, दोडगी, काकडी, काटेकगणा, कारांदे तर हिवाळ्यात मिरची, वाल आदी उत्पन्नाचा समावेश आहे. तसेच दिवाळीत तुळशीविवाहासाठी लागणाऱ्या ऊसाचे कमी प्रमाणात का होईना उत्पन्न घेतात. बाजारातील मागणीनुसार पिकांचे उत्पन्न घेऊन आपल्या या शेतीला बाजारपेठेशी जोडल्याने सावंत कुटुंबाला आर्थिक उत्पनाचा डोलारा सांभाळणे शक्य झाले आहे.
मेहनतीद्वारे खेचून आणले यश
आजच्या या भांडवली काळात बहुतांश लोक शेतीकडे पाठ फिरवून नोकरीला प्राधान्य देतात. सत्तरीसारखा ग्रामीण भागही त्यास अपवाद नाही. पण सावंत कुटुंबाने अशा लोकांसमोर चांगला आदर्श घालून दिला आहे. रत्नाकांत हे जेमतेम शिक्षण घेतलेले. पारंपरिक शेतीकडे त्यांचा कल. पण त्यांनीही आता आपले उत्पन्न वाढवले आहे. त्यांची बायको रेखा ही माध्यमिक शिक्षण घेतलेली महिला. शेती करण्याबरोबरच बाजारात बसून आपल्या पिकांची विक्री करून चार पैसे जास्त कमावते. कोणतेही काम तिने कधी कमीपणाचे मानले नाही. म्हणूनच आज हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून यशाचे मानकरी ठरले आहे.
शेतीच्या रक्षणासाठी रात्रीही जागवल्या
स्वतःच्या जमिनीत मजुरांच्या साहाय्याने शेतीचा व्यवसाय करणारी अनेक कुटुंबे आहेत. पण स्वत: काबाडकष्ट करून सरकारी अनुदानाअभावी स्वावलंबी बनलेली कुटुंबे क्वचितच सापडतात. त्यात सावंत कुटुंबाचा समावेश होतो. वाढत्या जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेती करणे कठीण बनले आहे. पण या कुटुंबाने रात्री जागवून आपल्या शेतीचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करीत शेतमळे फुलवले आहेत. त्यामुळे बदलत्या अर्थव्यवस्थेच्या काळात यांचे हे उदाहरण कृषी व्यवस्थेला प्रोत्साहन देणारे ठरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.