PWD Recruitment Scam: काब्रालांच्‍या मंत्रिपदावर गंडांतर अटळ; मुख्‍यमंत्री सावंत कात्रीत

PWD Recruitment Scam केंद्रातून दबाव : भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपातून खांदेपालट नामुष्‍कीजनक
PWD Recruitment Scam
PWD Recruitment ScamDainik Gomantak

PWD Recruitment Scam सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त राज्यात थडकले आणि दिवसभर राजकीय हालचालींनी, चर्चेने गती घेतली होती.

मंत्रिमंडळात बदल होणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टाळल्याने या चर्चेला बळ मिळाले. काब्राल यांनी आपल्याला अद्याप कोणी राजीनामा देण्यास सांगितले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण या जोरदार राजकीय हालचालींत त्यांचा आवाज क्षीण होत गेला होता.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने आज ठळकपणे प्रसिद्ध केल्याने राजकीय वावटळीला सकाळीच सुरवात झाली. विरोधी गोटातूनच कशाला, सत्ताधारी गोटातील जबाबदार व्यक्तींनीही या वृत्तात तथ्य आहे असे सांगितले.

निवड न झालेल्या उमेदवारांनीही या वृत्तीची पृष्टी केली. याच दरम्यान काब्राल यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त येऊन थडकले, त्यावेळी काब्राल दिल्लीत होते.

शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय संघटनसचिव बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत काब्राल यांना राजीनाम्याची सूचना केल्याची माहिती सार्वत्रिक झाल्यानंतर त्याविषयीच्या चर्चेने जोर धरला. त्याला भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी दुजोरा देणे सुरू केल्याने बळकटी मिळाली आणि काब्राल कोणत्याही क्षणी राजीनामा देतील, असे वातावरण तयार झाले.

मुख्‍यमंत्र्यांची संदिग्‍धता; काब्रालांचा आवाज क्षीण

1. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. काब्राल यांना वगळून आलेक्स सिक्वेरा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार या चर्चेत तथ्य आहे का असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता जेव्हा होईल तेव्हा सांगू असे त्रोटक उत्तर दिले.

2. मंत्रिमंडळ फेररचना तरी होणार आहे का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देताच जाणे पसंत केले. यामुळे मंत्रिमंडळ फेररचना होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही त्याअर्थी अशी फेररचना होणार आहे, असा अर्थ काढला जात आहे.

3. यामुळे काब्राल यांच्यासोबत आणखीन कोणाकोणाला मंत्रिपदाला मुकावे लागेल याची चर्चा सुरू झाली आहे. काब्राल यांनी मात्र कर्मचारी भरतीत घोटाळा झाला नाही असे नमूद केले आहे.

4. असा घोटाळा झाल्याचे कोणी उमेदवाराने दाखवून दिल्यास मंत्रिपदच काय आमदारकीची सोडू असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेत काब्राल यांचा आवाज क्षीण होत गेला होता.

शपथविधी झाल्‍यास मंगळवारनंतरच!

राजभवनावर शपथविधी आयोजित करण्यासाठी राज्यपाल रविवारी सायंकाळपासून उपलब्ध असतील. सध्या ते केरळमध्ये आहेत. काब्राल यांना राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागेल. मुख्यमंत्री तो स्वीकारून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे पाठवतील.

त्यानंतर मंत्रिपदी कोणत्या आमदाराची वर्णी लावावी त्याच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांना करावी लागेल. हा समारंभ राजभवनावर होत असला तरी त्याचे आयोजन सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्यातर्फे केले जाते.

त्या खात्याला अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शपथविधीचा सोहळा झालाच तर तो मंगळवानंतरच होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com