

मडगाव: जून महिना अर्ध्यावर पोहोचला असताना राज्यात अद्याप पाऊस सुरू झालेला नाही; मात्र रस्त्यांवरील अपघाती बळींचा जणू पाऊस पडत असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या जून महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत तब्बल १७ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.
रविवारी गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून राज्य सावरत नाही तोच सोमवारी आणखी दोन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. या सात मृत्यूंपैकी सहा मृत्यू दुचाकी अपघातांशी संबंधित असून गोव्यात दुचाकी अपघात हे अपघाती मृत्यूंचे प्रमुख कारण ठरले आहे. जूनच्या पहिल्या १५ दिवसांत झालेल्या १७ मृत्यूंपैकी १० बळी दुचाकी चालकांचे आहेत, तर तीन बळी दुचाकीच्या मागे बसलेल्यांचे आहेत.
राज्यात गरमीचा पारा वाढलेला असताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा आणि या अपघातांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची गरज आहे. उष्ण हवामानाची माहिती देणारी तसेच त्यापासून वाहनचालकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत सूचना देणारी व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे. अपघात नेमका कसा झाला आणि त्याची नेमकी कारणे काय आहेत, हे निश्चित करण्यासाठी तातडीने अहवाल तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरून हे अपघात कसे टाळता येतील, याबाबत उपाययोजना करता येईल.
गोवा वाहतूक पोलिसांनी मे महिन्यातील अपघातांची माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मागील वर्षाच्या पाच महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या पाच महिन्यांत अपघातांची संख्या ९.५० टक्क्यांनी घटली असली, तरी या अपघातांत गंभीर जखमी झालेल्यांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.