

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर तसेच मनोज परब यांच्या गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. परब गटाने सोमवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्याची घोषणा केली. शिवाय सभापतींना पत्र पाठवून पक्षातून निलंबित केलेले आमदार बोरकर यांना अपात्र ठरवण्याची मागणीही केली जाणार असल्याचे सांगितले. खजिनदार अजय खोलकर, उपाध्यक्ष सॅबी फर्नांडिस, अनिष नाईक, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष गौरेश मांद्रेकर आणि संस्थापक सदस्य रोहन कळंगुटकर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
‘आरजी’ पक्ष आमच्याच ताब्यात असून, येत्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. निवडणुकीची तयारीही आम्ही सुरू केली आहे. पेडणे, मांद्रे, डिचोली, थिवी, शिवोली, साळगाव, हळदोणा, कळंगुट, सांताक्रुझ, प्रियोळ, मडकई, वाळपई, शिरोडा, कुडतरी, कुंकळ्ळी, बाणावली, सावर्डे आणि सांगे या अठरा मतदारसंघांतील गटसमित्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत, असा निर्धार खोलकर यांनी व्यक्त केला.
आमदार वीरेश बोरकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे आधीच त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. लवकरच सभापती गणेश गावकर यांना पत्र पाठवून आमदार बोरकर यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. तसेच बोरकर यांच्याकडून कृत्यांबाबत आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे आक्षेपही नोंदवला आहे, असेही खोलकर यांनी नमूद केले.
उमेदवारांना ‘फॉर्म बी’ आम्हीच देणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सध्या ‘आरजी’त नसलेल्यांशी आघाडीबाबत चर्चा करत आहेत. निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांना आमचा पक्षच ‘फॉर्म बी’ देणार आहे, असेही खोलकर यांनी नमूद केले.
सांत-आंद्रेतही उमेदवार देऊ : आमदार वीरेश बोरकर यांचा मतदारसंघ असलेल्या सांत-आंद्रेतील गटसमितीबाबत पत्रकारांनी विचारले असता, सांत-आंद्रेतील गटसमितीचीही लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असून विधानसभा निवडणुकीत तेथेही आम्ही उमेदवार देऊ, असे खोलकर म्हणाले.
पक्षात परतण्याबाबत मनोज सकारात्मक
‘आरजी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्यासाची घोषणा केलेले मनोज परब पुन्हा पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता, ‘आरजी’त पुन्हा परतण्याबाबत परब यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु ते पक्षात कधी प्रवेश करणार त्याबाबतची तारीख निश्चित झालेली नाही, असेही खोलकर यांनी स्पष्ट केले.
मला निलंबित करण्याचा अधिकार वीरेशना नाही : खोलकर
‘आरजी’च्या संविधानात राष्ट्रीय अध्यक्ष पदाची तरतूद नाही. पक्षाचे सर्व अधिकार अध्यक्षांना जातात. तरीही बोरकर यांनी स्वत:च स्वत:ची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली असून पक्षातून निलंबित केलेल्यांना घेऊन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या समित्यांना कोणताही अर्थ नाही, असे खोलकर म्हणाले. शिस्तपालन समिती स्थापन करण्याचा अधिकार कोअर समिती आणि आमसभेला असतो. तरीही बोरकर यांनी बेकायदा शिस्तपालन समितीची स्थापना केली आहे. या समितीला आपले निलंबन करण्याचा अधिकार नाही. आपल्याला केवळ कोअर समिती आणि आमसभाच निलंबित करू शकते, असा दावाही खोलकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.