शिवोली : वोळांत -आसगाव (Asagaon Bardez) येथील दत्तात्रय मंदिर परिसरात दिल्लीस्थित बिल्डरकडून चाललेल्या निवासी इमारत बांधकाम प्रकल्प (Residental Houses Project) सुरू आहे. त्याविरुद्ध मंगळवारी सुमारे शंभरेक ग्रामस्थांनी पंचायत कार्यालयावर मोर्चा आणला. या प्रकल्पाला पंचायत मंडळाकडून परवानगी देण्यात आल्याने येथील पुरातन झऱ्याचे अस्तित्व नष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. यावेळी सरपंच हनुमंत नाईक तसेच ग्रामस्थांत शाब्दिक चकमक उडाल्याने तणाव निर्माण झाला होता.
नैसर्गिक झरीचे अस्तित्व नष्ट होणार असल्याने त्या प्रकल्पाला दिलेली परवानगी मागे घ्यावी, यासाठी ग्रामस्थांनी पंचायतीवर मोर्चा आणला होता. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच हनुमंत नाईक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच विरोध करणारे फलक हाती धरले होते. परिस्थितीचा अंदाज घेत हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अमीर तरल पोलिस फौजफाट्यासहित घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे प्रकरण हातघाईवर येण्यापासून वाचले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष चंदन मांद्रेकर यांनी वोळांत येथील सर्वे क्र. १७१/१० परिसरात एकूण २१ सदनिकांसाठी संबंधित बिल्डरला आसगाव पंचायत मंडळाकडून फेब्रुवारी २०२१ मध्ये देण्यात आलेला परवाना जोपर्यंत मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा स्थानिक प्रसारमाध्यमांकडे बोलताना दिला.
सचिव अनुपस्थित राहिल्याने नाराजी
यावेळी औदुंबर दत्तात्रय देवस्थानचे शिवानंद माडकर, विष्णू मांद्रेकर, प्रवीण बांदोडकर, स्वामी मडीवाल, तसेच माजी अध्यक्ष दिलीप गावडे यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच हनुमंत नाईक यांनी मोर्चेकरांच्या रोषाला सामोरे जाण्याचे धाडस दाखवीत नगरनियोजन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून मंगळवारी दुपारी ३.३० वा.पर्यंत संबंधित बिल्डरला येथील प्रकल्पासाठी दिलेला परवाना मागे घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत सचिव हेमंत गोवेकर कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने लोकांच्या संतापाचा पारा चढला. त्यामुळे दुपारी ३ वा.पर्यंत मोर्चेकरी पंचायत कार्यालयाच्या आवारात ठाण मांडून बसले होते.
वोळांत परिसरात उभा राहाणारा रहिवासी प्रकल्प नगरनियोजन प्राधिकरणाच्या परवानगीनुसार निर्माणाधीन आहे. मात्र, त्यापासून पुरातन झऱ्याचे अस्तित्व धोक्यात आल्याने परवाना मागे घेण्यात येईल. त्यामुळे यावरून कुणीच राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये.
-हनुमंत नाईक, आसगाव सरपंच
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.