पणजी : राज्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने केवळ 47 दिवसांत 75 इंचाची बारी ओलांडली. आतापर्यंत 1918.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यान निर्माण झालेला चक्रीय कमी दाबाचा पट्टा ओमानकडे सरकल्याने मुसळधार पावसाने रविवारी उसंत घेतल्याने अनेक दिवसानंतर लोकांनी कडकडीत उन्हाचा अनुभव घेतला.
अंदमान-निकोबारमध्ये 22 मे ला दाखल झालेल्या मॉन्सून केरळमध्ये ही वेळेअगोदर दाखल झाला. मात्र, कारवारजवळ मॉन्सूनने तब्बल 10 दिवसाची विश्रांती घेतल्याने राज्यात दाखल व्हायला त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा ५ दिवस उशीर झाला. 10 जूनला राज्यात दाखल झालेला मॉन्सूनने केवळ 47 दिवसांत मोठी भरारी घेतली असून तो सरासरीपेक्षा 27.8 टक्क्यांनी जास्त आहे. अद्यापही ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 5 जुलैला 156.2 मिमी आणि 8 जुलैला 161.7 मिमी इतकी अतिवृष्टी स्वरूपाची हजेरी लावल्याने सरासरीतील कमी भरून काढली आहे.
सर्वाधिक पाऊस केपेत
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस केपे येथे 2,322.8 मिलिमीटर झाला. त्या खालोखाल पेडणे येथे 2185.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय फोंडा येथे 2003.4 मिलिमीटर, सांगे येथे 2093.5 मिलिमीटर, काणकोण येथे 2077.6 मिलिमीटर, तर वाळपई येथे 2063.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सरासरीपेक्षा जास्त पडलेल्या पावसाने आता उसंत घेतली आहे. पुढील आठवड्यात काहीच ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. अन्यथा सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. असे असले तरी गुजरात जवळच्या अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसात कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता असल्याने 4 ते 5 दिवसानंतर पाऊस पुन्हा जोर धरू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.